Russian Ukraine Crisis : रशिया आणि युक्रेन (Russian Ukraine Conflict) या दोन्ही देशांमधील संघर्ष अद्याप कायम आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला सहा महिने पूर्ण झाले आहेत. हा संघर्ष संपण्याची चिन्ह अद्यप दिसत नाहीय. 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला चढवत या युद्धाला सुरुवात केली. यामध्ये युक्रेनमध्ये मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे. युक्रेनमधील हजारो नागरिक आणि सैनिक मारले गेले आहेत. ठिकठिकाणी विध्वंस पाहायला मिळत आहे. 


युक्रेनच्या नऊ हजारहून अधिक सैनिकांचा मृत्यू


रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत युक्रेनचे नऊ हजारहून अधिक सैनिक मारले गेले आहेत. तर संयुक्त राष्ट्राच्या माहितीनुसार, रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत पाच हजारहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती देताना युक्रेनचे लष्कर प्रमुख जनरल व्हॅलेरी झालुझनी यांनी सांगितलं आहे की, अद्याप रशिया-युक्रेनमधील युद्ध संपण्याची चिन्हं दिसत नाहीय. जनरल व्हॅलेरी झालुझनी यांनी एका कार्यक्रमात सांगितले , युक्रेनमधील अनेक मुलांच्या डोक्यावर छत्र हरपलं आहे. त्यांनी काळजी घेण्याची गरज आवश्यक आहे. तर सुमारे 9,000 सैनिकांच्या मृत्यूनंतर त्यांची मुलं निराधार झाली आहेत. अनेक मुलांनी त्यांचे दोन्ही पालक गमावले आहेत.


युक्रेनच्या स्वातंत्र्यदिनी रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला


युक्रेनने 24 ऑगस्ट रोजी 31 वा स्वातंत्र्यदिन (Ukraine's Independence Day) साजरा केला. यावेळी जगभरातून युक्रेनवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. मात्र या आनंदावर रशियाने क्षेपणास्त्र हल्ला करत विरजण लावलं. युक्रेनच्या स्वातंत्र्यदिनी रशियाने युक्रेनवर मिसाईल अटॅक केला. रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात 22 नागरिक ठार झाले आणि पूर्व युक्रेनमध्ये एका प्रवासी ट्रेनला आग लागली, असं कीव्हमधील अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. या हल्ल्याच्या आदल्या दिवशी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी रशियाकडून हल्ल्याची शक्यता व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर युक्रेनमधील स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमही रद्द करण्यात आले होते. त्यानंतर स्वातंत्र्यदिनी रशियाने रेल्वे स्थानकावर हल्ला केला यामध्ये 22 जण मारले गेले आहेत.


* रशियाच्या नेमक्या अटी कोणत्या?


1. संविधानात बदल करा 


रशियाच्या विरोधानंतरही युक्रेन नाटोमध्ये सहभागी होत आहे. अमेरिका आणि नाटोकडूनदेखील असेच प्रयत्न सुरू आहेत. युक्रेनने तटस्थ राहावे यासाठी आपल्या संविधानात बदल करावेत अशी अट रशियाने घातली आहे. संविधानात बदल केल्यास नाटो आणि युरोपीयन युनियनसारख्या संघटनेत सहभागी होणे अडचणीचे ठरणार आहे. 


2. क्रीमियाला मान्यता द्या


युक्रेनला क्रीमियाला रशियाचा भूभाग म्हणून मान्यता द्यावी असेही रशियाने म्हटले आहे. कधीकाळी क्रीमिया हा रशियाचा भूभाग होता. सोव्हिएत महासंघाचे नेते निकिता ख्रुश्चेव यांनी 1954 म्हणून हा प्रांत युक्रेनला भेट म्हणून दिला होता. त्यानंतर 2014 मध्ये रशियाने हल्ला करून क्रीमियाला ताब्यात घेतले. मात्र, युक्रेनने अद्यापही याला अधिकृत मान्यता दिली नाही. क्रीमियाच्या भूभागाला मान्यता दिल्यास युद्ध बंद होईल असे रशियाने म्हटले आहे. 


3. डोनेत्स्क-लुहांस्कला स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्या


सन 2014 मध्ये पूर्व युक्रेनमधील डोन्बास प्रांतातील डोनेत्स्क आणि लुहांस्क मध्ये फुटीरतावाद्यांनी स्वतंत्र देश म्हणून घोषित केले होते. युक्रेनसोबत युद्ध सुरू करण्याआधीदेखील रशियाने या प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून जाहीर केले होते. युक्रेननेदेखील या प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्यावी अशी मागणी रशियाने केली आहे. 


* रशिया आणि युक्रेनमधील वादाचं मूळ नाटो


सध्या जगाची चिंता वाढवणाऱ्या रशिया आणि युक्रेनमधील वादाचं मूळ नाटो (NATO) असल्याचं मानलं जात आहे. NATO म्हणजे, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. ज्याची सुरुवात 1949 मध्ये झाली. युक्रेनला नाटोमध्ये सामील व्हायचं आहे, परंतु रशियाची याच्याविरोधात आहे. युक्रेन नाटोमध्ये सामील झाल्यास नाटो देशांच्या लष्कराची मदत युक्रेनला होईल, असं रशियाला वाटतंय. रशियाला नाटोचा इतका द्वेष का? हे समजून घेण्यासाठी आधी हे समजून घेणं आवश्यक आहे की, नाटो म्हणजे काय?


दरम्यान, दुसरं महायुद्ध 1939 ते 1945 दरम्यान झालं. यानंतर सोव्हिएत युनियननं पूर्व युरोपातील भागांतून सैन्य मागे घेण्यास नकार दिला. 1948 मध्ये बर्लिनलाही वेढा घातला गेला. यानंतर अमेरिकेनं 1949 मध्ये सोव्हिएत युनियनचं विस्तारवादी धोरण थांबवण्यासाठी NATO ची स्थापना केली. जेव्हा NATO ची स्थापना झाली, तेव्हा त्यात युनायटेड स्टेट्स, ब्रिटन, फ्रान्स, कॅनडा, इटली, नेदरलँड्स, आइसलँड, बेल्जियम, लक्झेंबर्ग, नॉर्वे, पोर्तुगाल आणि डेन्मार्क यांच्यासह 12 देशांचा समावेश होता. आज नाटोमध्ये 30 देशांचा समावेश आहे.  


* रशियाला NATO चा द्वेष का? 


दुसरे महायुद्ध संपल्यानंतर जग दोन गटांमध्ये विभागलं गेलं. दोन महासत्ता होत्या. एक अमेरिका आणि एक सोव्हिएत युनियन. याला शीतयुद्धाची सुरुवातही मानलं जातं. 25 डिसेंबर 1991 रोजी सोव्हिएत युनियन विघटन झालं. त्यानंतर 15 नवीन देश निर्माण झाले. हे 15 देश म्हणजे आर्मेनिया, अझरबैजान, बेलारूस, एस्टोनिया, जॉर्जिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, लाटविया, लिथुआनिया, मोल्दोव्हा, रशिया, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, युक्रेन आणि उझबेकिस्तान. 


सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर जगात एकच महासत्ता शिल्लक राहिली ती म्हणजे, अमेरिका. त्यानंतर अमेरिकेच्या नेतृत्त्वाखाली असलेल्या NATO ची व्याप्ती वाढतच गेली. सोव्हिएत युनियनमधून बाहेर पडलेले देश NATO मध्ये सहभागी होत गेले. 2004 मध्ये इस्टोनिया, लातविया आणि लिथुआनिया NATO मध्ये सहभागी झाले. तर 2008 मध्ये जॉर्जिया आणि युक्रेन यांनाही NATO मध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रण देण्यात आलं. परंतु, दोन्ही देश नाटोमध्ये सहभागी होऊ शकले नाहीत. 


NATO च्या विस्तारावर रशियन राष्ट्रपती पुतिन यांचा आक्षेप होता. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पुतिन म्हणाले होते की, "पूर्वेकडील नाटोचा विस्तार मान्य नसल्याचं आम्ही स्पष्ट केलं आहे. अमेरिका क्षेपणास्त्रं घेऊन आपल्या दारात उभी आहे. कॅनडाच्या किंवा मेक्सिको सीमेवर क्षेपणास्त्रं तैनात केली तर अमेरिकेला कसं वाटेल?"


दरम्यान, असं म्हटलं जातंय की, एक वेळ होती, त्यावेळी पुतिन यांना रशियाचाही NATO मध्ये समावेश करायचा होता. पण आता पुतिनच नाटोचा द्वेष करु लागले आहेत. एस्टोनिया, लॅटव्हिया, लिथुआनिया आणि रशियाच्या सीमेवर असलेलं तुर्की हे नाटोचं सदस्य आहेत. जर युक्रेनही नाटोमध्ये सामील झालं तर रशियाच्या सीमा पूर्णपणे घेरल्या जातील. युक्रेन नाटोमध्ये गेल्यास भविष्यात नाटोची क्षेपणास्त्रं काही मिनिटांत युक्रेनच्या भूमीवर उभी राहतील. हे रशियासाठी मोठं आव्हान आहे, असा युक्तिवाद पुतिन यांनी केला आहे.