Russian MP Pavel Antov Death Case: रशियन राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन (VLADIMIR PUTIN) यांची कार्यशैली सातत्यानं चर्चेत असते. पण सध्या याच रशियातल्या दोन व्यक्तींच्या संशयास्पद मृत्यूनं खळबळ उडाली आहे. यातले एक तर रशियाचे गर्भश्रीमंत खासदार आहेत.  चार दिवसांच्या अंतरानं दोन रशियन व्यक्तींचे संशयास्पद मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे. 


रशियातल्या गर्भश्रीमंत खासदारांपैकी एक पावेल अँटोव्ह आहे.  पावेल अँटोव्ह यांनी काही दिवसांपूर्वी पुतिन यांच्या युक्रेनविरोधातल्या नीतीवरुन जाहीर टीका केली होती. रशियातले हे खासदार भारतात ओडिशातल्या रयगडा भागात आले होते. म्हणजे जी ठिकाणं भारताच्या टुरिस्ट मँपवरही  नाही.


रशियन व्यक्तींच्या पाठोपाठ मृत्यूचं गूढ काय?



  • 21 डिसेंबरला चार रशियन व्यक्ती ओडिशाच्या रयगडामधल्या एका हॉटेलमध्ये आले

  • खासदार पावेल यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी ते आल्याचं सांगितलं जातंय

  • 22 डिसेंबरला त्यांच्या सहकाऱ्याचा मृत्यू झाला. पोस्टमार्टममध्ये हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचं सांगितलं जातंय.

  •  त्यानंतर अवघ्या तीनच दिवसांत खासदार पावेल अँटोव्ह यांचा मृत्यू झाला.

  • हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातंय. 

  • आता हे असं खिडकीतून पडून मृत्यू वगैरे बातम्या रशियासाठी नवीन नाहीत

  • पण पुतिन यांच्या देशातले हे खासदार यावेळी भारतात कसे आले, त्यांच्या मृत्यूभोवतीच्या अनेक प्रश्नांनी आपल्या नेत्यांनाही चक्रावून सोडलंय. 


 कोण होते पावेल अँटोव्ह?



  • ज्या खासदारांचा भारतात मृत्यू झाला ते कुणी साधेसुधे गृहस्थ नव्हते

  • रशियातल्या सर्वात श्रीमंत खासदारांमध्ये त्यांची गणना होते

  • शिवाय युनायटेड रशिया पार्टी या रशियाच्या सर्वात मोठ्या पुतिन समर्थक पक्षाचे ते नेते पण काही दिवसांपूर्वी त्यांनी पुतीन यांच्या युक्रेन नीतीवरुन टीका केली होती

  • अर्थात नंतर त्यांनी हे वक्तव्य गैरसमजातून झाल्याची सारवासारव केली होती

  •  एका सॉस कंपनीचेही ते मालक आहेत

  • या दोन्ही पाठोपाठ मृत्यूंचा भारताचे पोलीसही तपास करत आहेत. पण त्यातून काही ठोस कारण समोर येतंय का हेही पाहावं लागणार आहे.  


ओडिशासारख्या फारशा माहिती नसलेल्या राज्यात हे रशियन का फिरत होते. त्यांच्या मृत्यूनंतर मृतदेह रशियाला पाठवण्याऐवजी इथंच तातडीनं विल्हेवाट का लावली गेली, ज्या हॉटेलमध्ये ते थांबले होते ते साई इंटरनँशल नावाचं हॉटेल अडीच हजार रुपये प्रतिरात्र भाड्याचं आहे. रशियाचा कोट्यधीश खासदार इतक्या स्वस्त हॉटेलमध्ये का राहत होता? असे अनेक अनुत्तरित प्रश्न या घटनेतून निर्माण झाले आहेत.