Russian Jet Collides with US Drone : युक्रेन युद्धाबाबत रशिया (Russia) आणि अमेरिका (America) यांच्यात सुरु असलेल्या तणावाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काळ्या समुद्रात दोन रशियन जेट आणि एका अमेरिकन ड्रोनमध्ये टक्कर झाल्याचं पाहायला मिळत आहे. अमेरिकेच्या लष्कराने यासंदर्भात माहिती दिली आहे. दरम्यान, काळ्या समुद्राच्या सीमा रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांना जोडलेल्या आहेत. युक्रेन युद्धामुळे गेल्या काही महिन्यांत या भागांत लष्करी हालचाली वाढल्या आहेत. 


काळ्या समुद्रात रशियन जेट आणि अमेरिकन ड्रोन यांच्यात टक्कर झाल्याचं वृत्त आहे. सीएनएननुसार, रशियन फायटर जेटने अमेरिकन हवाई दलाच्या ड्रोनला धडक दिली, त्यानंतर ते ड्रोन काळ्या समुद्रात कोसळलं. मंगळवारी (14 मार्च) काळ्या समुद्रावर जेव्हा रशियन जेट आणि अमेरिकन एमक्यू-9 रीपर ड्रोन आमनेसामने आले, तेव्हा विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती. सीएनएनच्या वृत्तानुसार, यावेळी रशियन जेटने अमेरिकन ड्रोनच्या प्रोपेलरचं नुकसान केलं.


अमेरिकेचं रीपर ड्रोन आणि रशियाची दोन SU-27 लढाऊ विमानं काळ्या समुद्राच्या आंतरराष्ट्रीय जल सीमेवर घिरट्या घालत होते. सीएनएनने अमेरिकन अधिकार्‍यांच्या हवाल्याने म्हटलं आहे की, यादरम्यान एक रशियन जेट जाणूनबुजून अमेरिकन ड्रोनसमोर आलं आणि जेटमधून तेल सोडण्यास सुरुवात केली. यादरम्यान एका जेटने ड्रोनच्या प्रोपेलरचे नुकसान केलं. हा प्रोपेलर ड्रोनच्या मागच्या बाजूला जोडलेला होता. प्रोपेलरच्या नुकसानीनंतर, अमेरिकन सैन्याचं ड्रोन काळ्या समुद्रात कोसळलं. 


प्रोपेलर ड्रोनच्या पंख्याप्रमाणे आहे, जेव्हा प्रोपेलरचे ब्लेड फिरतात तेव्हा ते थ्रस्ट निर्माण करतात. यामुळेच ड्रोनला उडण्यास मदत करते. 


काळ्या समुद्राची सीमा युक्रेन आणि रशियाला लागून 


काळा समुद्रच्या सीमा रशिया आणि युक्रेनला लागून आहेत. दोन्ही देशांना जोडणारा हा मुख्य जलमार्ग आहे. युक्रेन युद्धामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून या भागांत लष्करी हालचालींना वेग आला आहे. तसेच, या परिसरातील तणावही वाढला आहे. युक्रेन युद्धादरम्यान रशियन आणि अमेरिकन विमानं काळ्या समुद्रावरून उडत राहतात. परंतु दोन्ही देशांची लढाऊ विमान एकमेकांसमोर येण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि अशी परिस्थितीही पहिल्यांदाच उद्भवली आहे.  


या घटनेवर अमेरिकन हवाई दलाने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. यूएस एअर फोर्सनं म्हटलं आहे की, "Su-27 या दोन रशियन विमानांनी असुरक्षित आणि अव्यावसायिक पद्धतीने यूएस एअर फोर्सचं निरीक्षण आणि टोही मानवरहित MQ-9 ड्रोन रोखलं. अमेरिकन ड्रोन आंतरराष्ट्रीय सीमेच्या आत उड्डाण करत असताना हा प्रकार घडला होता.


जेटच्या धडकेने ड्रोनचा प्रोपेलर नष्ट 


यूएस आर्मीच्या मते, सकाळी 7.03 वाजता (सेंट्रल यूरोपियन टाईम) रशियन एसयू-27 ने अमेरिकन ड्रोनचा प्रोपेलर नष्ट केला. रशियन जेटने अमेरिकन ड्रोनला धडक दिली आणि त्यावर इंधनही टाकलं, असा अमेरिकेच्या लष्कराचा दावा आहे. तसेच, रशियन लष्कराच्या या आक्रमक कारवाया धोकादायक असून यामुळे दोन्ही देशांमधील संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढू शकतो, असे अमेरिकी लष्कराने म्हटले आहे.


जेम्स बी. हेकर, यूएस एअर फोर्सचे अधिकारी आणि यूएस एअर फोर्सेसचे युरोप आणि एअर आफ्रिकेचे कमांडर यासंदर्भात बोलताना म्हणाले की, "आमचे MQ-9 विमान आंतरराष्ट्रीय हवाई हद्दीत नियमित ऑपरेशन करत होते. तेव्हा ते रशियन विमानाने अडवलं आणि आदळलं, परिणामी अपघात झाला आणि MQ-9 चं संपूर्ण नुकसान झालं."