Afghanisthan Crisis : तालिबानच्या ताब्यात आल्यापासून अफगाणिस्तानातील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. वाढती गरिबी, बेरोजगारी, उपासमारी यामुळे येथील परिस्थिती हलाखीची होत चालली आहे. त्यामुळे नागरिकांवर कर्जाचा बोजाही वाढत आहे. लोक दोन वेळच्या भाकरीसाठी काहीही करायला तयार आहेत. अफगाणिस्तानातील लोकांना त्यांची मुले आणि किडनीही विकावी लागत असल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे.
एका अहवालानुसार, अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये मोठ्या संख्येने लोकांनी आपली किडनी विकली आहे. दोन वेळेच्या अन्नासाठी त्यांना हे पाऊल उचलावे लागले आहे. काहींनी तर एक लाख ते चार लाख रुपयांना आपली किडनी विकली आहे. मात्र त्यांना मिळालेले बहुतांश पैसे कर्ज फेडण्यात गेले आहेत. घर चालवण्यासाठी लोक रस्त्यावर भीक मागू लागले आहेत तर, काही लोक पैशासाठी आपली मुलेही विकायला तयार आहेत.
अफगाणिस्तानातील सुमारे 4 दशलक्ष मुले कुपोषित
संयुक्त राष्ट्राने दावा केला आहे की, अफगाणिस्तानातील सुमारे चार दशलक्ष अफगाण बालके कुपोषणाने प्रभावित होण्याची शक्यता आहे, त्यापैकी 2022 मध्ये 1 लाख 37 हजार मृत्यू होऊ शकतात. युएनच्या शिष्टमंडळाने सांगितले आहे की, किमान 18 दशलक्ष अफगाण नागरिकांना अन्न असुरक्षिततेचा सामना करावा लागत असून त्यापैकी 9 दशलक्ष लोकांना अन्नाची नितांत गरज आहे.
युएन ऑफिस ऑफ ऑपरेशन्स अँड अॅडव्होकेसीच्या डायरेक्टर रीना घेलानी यांनी सांगितले की, 'आम्हाला तेथील लोकांशी अधिक संवाद साधण्याची आणि त्यांच्या तक्रारी ऐकण्याची गरज आहे. जेणेकरून आम्ही सर्व अफगाण लोकांना त्या नेमक्या समस्यांबद्दल विचारू शकू आणि समस्यांचे निवारण करु शकू.'
तालिबानचा ताबा घेतल्यापासून 86 अफगाण रेडिओ स्टेशन बंद
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तालिबान सत्तेवर आल्यापासून अफगाणिस्तानमध्ये सुमारे 86 रेडिओ स्टेशनचे कामकाज बंद झाले आहे. आकडेवारीच्या आधारे, 300 हून अधिक विविध प्रकारच्या मीडिया संस्था बंद झाल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine War : नागरीक घरातच झाले कैद, खाण्यापिण्याचे होताहेत हाल
- Russia Ukraine Conflict : हवाई प्रवास महागणार; युक्रेन-रशिया युद्धामुळे हवाई इंधनाच्या किमती विक्रमी पातळीवर
- Russia Ukraine War : युक्रेनमधील 182 भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचे विमान मुंबईत दाखल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha