Russia-Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये जवळपास 500 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या काळात दोन्ही देशांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान, गुरुवारी (5 ऑक्टोबर) रशियन सैन्याने ईशान्य युक्रेनमधील ह्रोझा गावावर क्षेपणास्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात 51 जणांचा मृत्यू झाला होता. एका मृत युक्रेनियन सैनिकाच्या शोक सभेदरम्यान शेकडो लोक उपस्थित असताना रशियाकडून हा हल्ला करण्यात आला.



'हा हल्ला मुद्दाम'
रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी हा हल्ला मुद्दाम करण्यात आल्याचे म्हटले. याला कोणत्याही प्रकारचा आंधळा हल्ला म्हणता येणार नाही. यावेळी झेलेन्स्की युरोपियन राजकीय समुदायाच्या शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी स्पेनमध्ये गेले होते. त्यांनी शिखर परिषदेदरम्यान रात्रीच्या व्हिडीओ संबोधनात सांगितले की खार्किव प्रदेशातील एका खेड्यात एका दुकानावर मुद्दाम क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. रशियन सैनिक कोठे हल्ले करत आहेत याची त्यांना कल्पना नाही. हल्ल्यानंतर ज्या ठिकाणी शोकसभा घेण्यात आली, त्या दुकानाची अवस्था बिकट झाली. घटनास्थळी विटा, तुटलेले धातू व बांधकाम साहित्याचे मोठे ढीग पडले होते.


 






 


 



हल्ल्यातील मृतांची संख्या 51
खार्किव प्रदेशातील ह्रोझा गावाजवळील एका प्रादेशिक अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमाला सांगितले की, रशियाच्या आक्रमणानंतर 19 महिन्यांहून अधिक काळ झालेल्या खार्किव प्रदेशातील हा सर्वात प्राणघातक हल्ला होता. रशियाने केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत मारल्या गेलेल्या नागरिकांची ही सर्वाधिक संख्या होती. स्थानिक पोलिसांनी नॅशनल टेलिव्हिजनला सांगितले की हल्ल्यातील मृतांची संख्या 51 आहे, तर 6 लोक जखमी झाले आहेत आणि 3 बेपत्ता आहेत.


 


ऋषी सुनक यांनी निषेध केला
युक्रेनच्या खार्किव भागात झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर रशियाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्याचवेळी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी रशियन हल्ल्याचा निषेध केला. हल्ल्याशी संबंधित माहिती देताना झेलेन्स्की म्हणाले की, मृतांमध्ये सहा वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. यावर एका प्रादेशिक अधिकाऱ्याने सांगितले की, युद्धादरम्यान आम्ही परिसर रिकामा करण्याचे आदेश दिले होते. मात्र, असे असूनही अनेक कुटुंबे गावातच राहिली.


 


बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ला
युक्रेनचे गृहमंत्री इहोर क्लिमेंको यांनी सांगितले की, क्षेपणास्त्र हल्ला झाला तेव्हा स्थानिक अधिकारी जेवायला बसले होते. क्लिमेंको यांनी युक्रेनियन प्रसारमाध्यमांना सांगितले की, ही एक भयंकर शोकांतिका आहे. प्राथमिक माहितीचा हवाला देत क्लिमेन्को यांनी सांगितले की, इस्कंदर बॅलेस्टिक क्षेपणास्त्राने हा हल्ला केल्याचे समोर आले आहे. ते म्हणाले की हा हल्ला स्पष्टपणे लक्ष्यित होता आणि युक्रेनियन सुरक्षा सेवांनी तपास सुरू केला आहे. युक्रेनचे संरक्षण मंत्री रुस्तम उमरोव यांनी सांगितले की, रशियाकडून जाणूनबुजून जेवणाच्या वेळी हल्ला करण्यात आला, जेणेकरून जास्तीत जास्त जीवितहानी होऊ शकते.


 


इतर महत्त्वाच्या बातम्या


India-Russia : 'ते एक अतिशय बुद्धिमान व्यक्ती..' रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक!