Russia Ukraine War : युक्रेनसाठी महत्त्वाच्या असलेल्या मारियुपोल या शहरावर आता रशियाने संपूर्ण ताबा मिळवला आहे. ही रशियाच्या रणनीतीमधील सर्वात मोठा विजय असल्याचं सांगितलं जातंय. या शहरात तब्बल 2000 युक्रेनी सैन्य आणि नागरिक अडकल्याची माहिती आहे. दरम्यान,या शहराला रशियन सैन्याने ब्लॉक केलं असून या ठिकाणाहून माशीलाही जिवंत बाहेर पडू नका असा आदेश रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी दिला आहे. 


मारियुपोल हे बंदर असलेलं शहर अझोव्ह सागराच्या किनारी आहे.  मारियुपोल या शहरावर कब्जा मिळवल्यानंतर रशियाला आता क्रिमियाशी जोडणारा रस्ता मिळणं सुलभ होणार आहे. रशियाने मारियुपोल या शहरावर हल्ला करण्यापूर्वी युक्रेनच्या सेनेला हत्यार खाली टाकण्याचं आवाहन केलं होतं. तसं केल्यास युक्रेनी सैन्यावर गोळीबार करण्यात येणार नाही असं आश्वासनही रशियाने दिलं होतं. 


रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी टीव्हीवर दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटलं आहे की,  रशियन सैन्याने मारियुपोलला स्वतंत्र केलं आहे. काही राष्ट्रवादी गटांनी अझोव्हेस्टल प्लॅन्टच्या इंडस्ट्रियल झोनमध्ये शरण घेतलं आहे. 


या प्लॅन्टमध्ये तब्बल दोन हजार युक्रेनी सैन्याने शरण घेतल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान झेलेन्स्की यांनी घोषणा केली की, ते सर्व रशियन कैद्यांची सुटका करणार आणि त्या बदल्यात रशिया सर्व युक्रेनियन नागरिक आणि सैनिकांना मारियुपोलमध्ये सुरक्षितपणे बाहेर निघण्याची परवानगी देणार आहे.


संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनीही पूर्व युक्रेनमध्ये रशियाच्या मोठ्या हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी मंगळवारी सांगितले की, पूर्व युक्रेनमधील रशियाच्या हल्ल्याने युद्ध अपरिहार्यपणे अधिक हिंसक, रक्तरंजित आणि विनाशकारी बनले आहे. गुटेरेस यांनी गुरुवारपासून सुरू होणार्‍या चार दिवसांच्या इस्टर आठवड्यात आणि 24 एप्रिल रोजी इस्टर संडेपर्यंत युद्ध मानवतेच्या आधारावर थांबवण्याचे आवाहन केले आहे.


महत्त्वाच्या बातम्या :