PM Narendra Modi : सध्या रशिया आणि युक्रेन (Russia-Ukraine) या दोन देशामध्ये युद्ध (War) सुरु आहे. या युद्धाबाबत मेक्सिकोनं (Mexico) मोठं वक्तव्य केलं आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये केवळ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हेच शांतता प्रस्थापित करु शकतात, असा दावा मेक्सिकोच्या वतीने संयुक्त राष्ट्रात करण्यात आला आहे. याबाबत मेक्सिकोने संयुक्त राष्ट्र संघाकडे समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये चिरस्थायी शांतता प्रस्थापित करण्यासाठी या समितीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, पोप फ्रान्सिस आणि संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांचा समावेश करावा, असेही मेक्सिकोने संयुक्त राष्ट्र संघाला दिलेल्या प्रस्तावात म्हटलं आहे.


पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचे अनेक देशांकडून स्वागत 


मेक्सिकोचे परराष्ट्र मंत्री मार्सेलो एब्रार्ड कॅसाबोन यांनी हा प्रस्ताव दिला आहे. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी मार्सेलो एब्रार्ड कॅसाबोन यांनी हा प्रस्ताव दिला आहे. उझबेकिस्तानमधील समरकंद येथे झालेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या 22व्या बैठकीत रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, आजचे युग युद्धाचे नाही. युक्रेनमध्ये सुरु असलेल्या संघर्षाच्या संदर्भात, पंतप्रधानांनी युद्ध लवकर बंद करण्याच्या तसेच संवाद सुरु करण्याचा पुनरुच्चार केला होता. भारतीय पंतप्रधानांच्या या वक्तव्याचे अमेरिका, फ्रान्स आणि युनायटेड किंग्डमसह पाश्चात्य जगाने स्वागत केले आहे.


आंतरराष्ट्रीय समुदायाने प्रयत्न केले पाहिजेत: मार्सेलो एब्रार्ड कॅसाबोन


रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबणे गरजेचं आहे. या दोन्ही देशांमध्ये शांतता गरजेची असल्याचे मत मेक्सिकोचे परराष्ट्र मंत्री मार्सेलो एब्रार्ड कॅसाबोन यांनी व्यक्त केले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायानं आता शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत असेही ते म्हणाले. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्या मध्यस्थी प्रयत्नांना बळ देण्यासाठी मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांचा प्रस्ताव मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छितो. शक्य असल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोप फ्रान्सिस यांच्यासह इतर राज्य आणि सरकार प्रमुखांनी आंतरराष्ट्रीय शांततेसाठी पुढे यावं असे कॅसाबोन यांनी म्हटलं आहे. संवादासाठी नवीन यंत्रणा आणि विश्वास निर्माण करण्यासाठी मध्यस्थीसाठी पूरक जागा तयार करणे, तणाव कमी करणे आणि चिरस्थायी शांततेचा मार्ग मोकळा करणे हा या समितीचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. संवाद, मुत्सद्देगिरी आणि प्रभावी राजकीय समित्यांच्या स्थापनेतूनच शांतता प्रस्थापित होऊ शकते, असेही कॅसाबोन यांनी म्हटलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या: