Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये मागील 13 दिवस युद्ध सुरू आहे. रशियाने केलेल्या हल्ल्याला युक्रेनकडून कडवा प्रतिकार सुरू आहे. एका बाजूला युद्ध सुरू असताना दुसरीकडे दोन्ही देशांकडून शांतता चर्चा सुरू आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये झालेली तिसऱ्या फेरीतील चर्चा निष्फळ ठरली आहे. 


रशिया आणि युक्रेन दरम्यान तिसऱ्या फेरीतील चर्चा बेलारूसच्या सीमेवर झाली. युक्रेनच्या शिष्टमंडळातील सदस्य पोडोलीक यांनी सांगितले की, परिस्थितीत सुधारणा होईल, काही ठोस निर्णय घेतला जाईल अशी चर्चा झाली नाही. मात्र, युद्धबंदी आणि सुरक्षेच्या हमीसह इतर मुद्यांवर चर्चा सुरूच  राहणार आहे. तर, रशियन शिष्टमंडळाचे प्रमुख मेडिंस्की यांनी सांगितले की, युक्रेनसोबत झालेल्या चर्चेत आमच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. राजकीय आणि लष्करी मुद्यावर चर्चा सुरू आहे. लवकरच काही सकारात्मक निर्णय होईल असे म्हणणे चुकीचे ठरेल असे त्यांनी म्हटले.


चार शहरात शस्त्रसंधी


रशियाने पुन्हा एकदा नागरिकांसाठी चार शहरांमध्ये शस्त्रसंधी लागू केली आहे. यामध्ये राजधानी कीव्ह, खारकीव्ह, सुमी आणि मारियूपोल या शहरांचा समावेश आहे. फ्रान्सने केलेल्या विनंतीवरून हा निर्णय घेण्यात आला आहे. रशियाने शनिवारीदेखील दोन शहरांसाठी शस्त्रसंधी लागू केली होती. 


रशियाकडून युक्रेनमधील नागरी विमानतळ उद्ध्वस्त


रशियाच्या रॉकेट हल्ल्यात युक्रेनचे विनितसिया येथील नागरी विमानतळ उद्ध्वस्त झाले आहे. याशिवाय रशियन सैन्याने युक्रेनचे दोन अणुप्रकल्प ताब्यात घेतले असून तिसरा प्रकल्प ताब्यात घेण्याचे रशियन सैन्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा दावा झेलेन्स्की यांनी केला होता.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha