Ukraine-Russia War : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा झाल्यानंतर युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी ट्वीट करत भारताचे आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दुपारी वोलोदिमिर झेलेन्स्की यांचीशी फोनवर चर्चा केली. या चर्चेनंतर वोलोदिमिर यांनी ट्विट करत आभार मानले आहेत.
वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेय की, रशियाच्या आक्रमणाला युक्रेनकडून दिल्या जाणाऱ्या प्रत्युत्तरासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती दिली. तसेच युद्धाच्या काळात भारतीय नागरिकांना दिली जाणारी मदतीबद्दल भारताने कौतुक केले आहे. एवढेच नाही, तर युक्रेनमधील जनतेला करण्यात येणाऱ्या मदतीबद्दल आपण भारताचे आभारी आहोत.
पंतप्रधान मोदी आणि वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यात काय झाली चर्चा?
युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये सुरू असलेल्या संघर्षमय परिस्थितीविषयी आणि वाटाघाटींविषयी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी तपशीलवार माहिती पंतप्रधानांशी बोलताना दिली. सध्या सुरू असलेला संघर्ष आणि त्याचा मानवतावादावर झालेला परिणाम याविषयी पंतप्रधान मोदी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. हिंसाचार त्वरित थांबवावा, याचा पुनरूच्चार करून पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले की, शांततापूर्ण मार्गाने निराकरण आणि, दोन्ही बाजूंमध्ये थेट संवाद याला भारताचा नेहमीच पाठिंबा असेल. युक्रेनमधून 20,000 पेक्षा जास्त भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी मदत केल्याबद्दल पंतप्रधानांनी युक्रेनच्या अधिका-यांचे आभार मानले. अद्याप काही भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत, त्यांच्या सुरक्षेविषयी गंभीर चिंता व्यक्त करून त्यांना तेथून तातडीने सुरक्षितपणे बाहेर काढण्याच्या गरजेवर पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना भर दिला.
खार्किवमध्ये 8 जणांचा मृत्यू -
या दोन्ही देशांमध्ये चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असला रशियाने युक्रेनवर बॉम्बहल्ले सुरूच ठेवले आहेत. अशातच आज रशियाने युक्रेनमधील खार्किव शहरात जोरदार बॉम्बहल्ला केला आहे. या हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, रशियाच्या मायकोलायव शहरातही रॉकेटचा स्फोट झाला आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशीही फोनवरून चर्चा करणार आहेत.