Russia Ukraine Conflict : रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत 137 युक्रेन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान, रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध होऊ नये म्हणून पुढाकार घेणाऱ्या फ्रान्सच्या राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन (French President Emmanuel Macron) यांनी या युद्धाशी संबंधित एक मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले आहेत की, ''जगाने मोठ्या युद्धासाठी तयार राहावं.'' त्यांच्या या विधानाचे अनेक अर्थ काढले जात आहेत. मॅक्रॉन यांचं म्हणणं आहे की, हे संकट आणखीन काळ असेच सुरू राहिल्यास युरोपियन संघाच्या अनेक देशांना याचा फटका बसेल. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन हे काही अंशी युरोपियन संघालाही लक्ष करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे नाटो देखील सज्ज आहे. अमेरिका तयार असल्यास नाटो देखील युक्रेनच्या मदतीला सैन्य पाठवू शकते, असं त्यांचं म्हणणं आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादमीर झेलेन्स्की यांचा देश सोडण्यास नकार
अमेरिकेने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादमीर झेलेन्स्की यांना देश सोडण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र झेलेन्स्की यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. झेलेन्स्की म्हणाले आहेत की, ''आम्हाला शस्त्रे हवी आहेत, सवारी नाही.'' यामध्येच आज अमेरिकन हवाई दलाची तीन विमाने रोमानियाच्या हवाई हद्दीत उडताना दिसली आहेत. या विमानांनी तीन तासांहून अधिक काळ उड्डाण केले. यामध्ये पोलंड हवाई क्षेत्रात विमानात इंधन भरणारे एक विमान आहे. हे विमान अमेरिकेतून बचावकार्यासाठी पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
हा हल्ल्याला संपूर्ण युरोपियन सुरक्षा व्यवस्थेवरील हल्ला - नाटो प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याबाबत शुक्रवारी नाटो प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी या हल्ल्याला संपूर्ण युरोपियन सुरक्षा व्यवस्थेवरील हल्ला म्हटले आहे. जेन्स स्टोल्टनबर्ग म्हणाले की, 'रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला हा युक्रेनवरील हल्ल्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. हा युक्रेनमधील निरपराध लोकांवर केलेला भयंकर हल्ला आहे. हा संपूर्ण युरोपियन सुरक्षा व्यवस्थेवरही हल्ला आहे.' ते म्हणाले, 'नाटोचे दल जमिनीवर, समुद्रात आणि हवेत तैनात केले जातात. क्रेमलिनची उद्दिष्टे केवळ युक्रेनपुरती मर्यादित नाहीत. युक्रेनचे सरकार बदलण्याचे मॉस्कोचे उद्दिष्ट आहे. मी युक्रेनच्या सशस्त्र दलांबद्दल माझा आदर व्यक्त करतो, ज्यांनी खरोखरच प्रचंड आक्रमण करणाऱ्या रशियन सैन्याविरुद्ध उभे राहून आपले शौर्य आणि धैर्य सिद्ध केले आहे.' दरम्यान, रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमधील परिस्थिती पाहता ब्रिटन, अमेरिका, इतर युरोपीय देशांसह 28 देशांनी युक्रेनला अधिक शस्त्रे, आरोग्य सुविधा आणि इतर लष्करी मदत देण्याचे मान्य केले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine Crisis : युक्रेनमधील अडकलेल्या भारतीयांसाठी एअर इंडियाच्या फ्लाइट्स, पुतिन यांच्याकडून भारतीयांच्या सुरक्षेचे आश्वासन
- Russia Ukraine Crisis : 1200 भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वड्डेट्टीवार यांची माहिती
- Russia Ukraine War: 'मैं झुकेगा नही...', युक्रेनची रक्षा करण्यासाठी कीवमध्येच उभा; राष्ट्राध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की यांचा व्हिडीओ व्हायरल