नवी दिल्ली : रशियाच्या आग्नेय (दक्षिण पूर्व) समुद्र किनाऱ्यावर 7.7 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के जाणवले असून, भूकंपाचा केंद्रबिंदू बर्निंग आयलँडपासून 200 किलोमीटर लांब असल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, भूकंपानंतर त्सुनामीचा इशाराही देण्यात आला आहे.

अमेरिकेच्या पॅसिफिक त्सुनामी सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून 300 किलोमीटर परिसरात त्सुनामीच्या उंचच उंच लाटा निर्माण होतील. याचा केंद्रबिंदू समुद्रात आत असल्याने, फारसे नुकासान होण्याची शक्यता नाही. तरी समुद्र किनाऱ्यावरील नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


अधिक माहितीनुसार, मंगळवारी स्थानिक वेळेनुसार निकोल्सकोय बेटावर सकाळी 11 वाजून 34 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू शहरापासून 200 किलोमीटर लांब कमचटका पेनिसुला आयलँडमध्ये होता.

दरम्यान, त्सुनामीच्या इशाऱ्यामुळे रशियाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सावधगिरीची सर्व उपाययोजना केल्या आहेत. भूकंपाचा केंद्रबिंदू समुद्रात आत असल्याने त्यामुळे निकोल्सकोय किनाऱ्यावर 1-2 फुटाच्या लाटा निर्माण होतील, असं सांगण्यात येत आहे.