Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या महिनाभरापेक्षा जास्त काळापासून युद्ध सुरू आहे. युद्ध सुरू असतानाच दोन्ही देश युद्ध संपवण्यासाठी वाटाघाटी करत आहेत. याच अनुषंगाने मंगळवारी तुर्कीतील इस्तंबूल येथे दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली आहे. या चर्चेनंतर लवकरच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की  (Volodymyr Zhelensky) यांची भेट होण्याची शक्यता आहे. 


युक्रेनियन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, झेलेन्स्की आणि व्लादिमीर पुतिन यांच्यात लवकरच बैठक होऊ शकते. इस्तंबूलमध्ये युक्रेनियनच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या पहिल्या फेरीच्या चर्चेपासून रशियन शिष्टमंडळही यासाठी आशावादी होते. परंतु, चर्चेच्या अनेक फेऱ्या निष्फळ ठरल्यानंतर मंगळवारी दोन्ही देशांचे शिष्टमंडळ आमनेसामने भेटले आणि त्यांच्यात शांततेसाठी चर्चा झाली आहे. 


युक्रेनचे डेव्हिड अर्खामिया यांनी दोन्ही देशांच्या अध्यक्षांमध्ये होणाऱ्या बैठकीबाबात सांगितले की, "आज दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांमधील बैठकीमधील चर्चा  पुतिन आणि झेलेन्स्की यांच्यामधील बैठकीसाठी पुरेशी आहे. झेलेन्स्की यांनी पुतिन यांच्यासोबत चर्चा करण्याची अनेक वेळा तयारी दर्शवली आहे. परंतु, रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने  दोन्ही नेत्यांमध्ये थेट चर्चा होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे.


रशियाचे उपसंरक्षण मंत्री अलेक्झांडर फोमिन म्हणाले की, "युक्रेनची राजधानी कीव्ह आणि उत्तरेकडील चेर्निहाइव्ह शहराजवळील हल्ले रशियाने कमी केले आहेत. दोन्ही देशांमधील युद्ध संपवण्याच्या उद्देशाने आणि चर्चेत आत्मविश्वास वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. युक्रेनच्या सैन्यानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. "कीव्ह आणि चेर्निहाइव्हच्या आसपास रशियन सैन्याने मंगळवारी माघार घेतली आहे. परंतु, पश्चिम आणि दक्षिणेकडील प्रदेशात रशियन हल्ले नेहमीप्रमाणे सुरूच आहेत, असे युक्रेनने म्हटले आहे.  


दरम्यान, या चर्चे आधी, झेलेन्स्की यांनी म्हटले आहे की, मॉस्कोने मागणी केल्याप्रमाणे युक्रेन तटस्थता घोषित करण्यास तयार आहे. याबरोबरच डॉनबासच्या पूर्वेकडील विवादीत प्रदेशावर तोडगा काढण्यास युक्रेन तयार होता. झेलेन्स्कीच्या यांच्या या वक्तव्यामुळे दोन्ही देशांतील चर्चेला सुरुवात होऊ शकते, असे बोलले जात आहे.  


महत्वाच्या बातम्या