Russia Moon Mission: रशियन स्पेस एजन्सी Roscosmos नं 1976 सालानंतर म्हणजेच, 47 वर्षांनंतर पहिल्यांदाच चंद्रावर आपली मोहीम पाठवली आहे. रशियानं लुना-25 लँडर सकाळी 8:10 वाजता (स्थानिक वेळेनुसार) अमूर क्षेत्रातील व्होस्टोचनी स्पेस पोर्टवरून प्रक्षेपित केलं. AP च्या वृत्तानुसार, रशियन शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की, लुना-25 21 ऑगस्टपर्यंत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल.


रशियानं सोयुझ 2.1 B रॉकेटसह लुना-25 लँडर प्रक्षेपित केलं. या रॉकेटची लांबी सुमारे 46.3 मीटर आहे. त्याचा व्यास 10.3 मीटर आहे. तर त्याचं वजन सुमारे 313 टन आहे. या मोहिमेला लुना-ग्लोब मिशन असंही म्हटलं जातंय.


चांद्रयान-3 च्या दोन दिवस आधी चंद्रावर पोहोचणार लुना-ग्लोब मिशन


लुना-25 लँडर पूर्णपणे रशियामध्ये तयार करण्यात आलं आहे. रशियानं चंद्र मोहिमेची सर्व तयारी स्वबळावर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी, यूएसएसआरनं सप्टेंबर 1958 ते ऑगस्ट 1976 दरम्यान 24 लुना मिशन लॉन्च केले आहेत. दुसरीकडे, जर लुना-25 चंद्रावर यशस्वीरित्या उतरलं तर ते भारताच्या चांद्रयान-3 च्या दोन दिवस आधी उतरेल.






चंद्रावर यशस्वी लँडिंग करण्यात केवळ तीन देशांना यश 


आतापर्यंतच्या इतिहासात केवळ तीनच देशांना चंद्रावर यशस्वी लँडिंग करण्यात यश आलं आहे. यामध्ये सोव्हिएत युनियन (USSR), अमेरिका आणि चीन यांचा समावेश आहे. भारत आणि रशियानं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर प्रथम उतरण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.


रशियाची स्पेस एजन्सी रोसकॉसमॉसनं यासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, रशिया चंद्रावर पेलोड वितरीत करण्यास सक्षम आहे, हे संपूर्ण जगाला त्यांना दाखवायचं आहे. तसेच, रशिया चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या लँड होईल, असा दावाही केला आहे.  
निर्बंधांमुळे विलंब


युक्रेनच्या आक्रमणानंतर रशियावर लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे त्यांच्या अंतराळ मोहिमेवरही परिणाम झाला आहे. विश्लेषकांचं म्हणणं आहे की, लुना-25 सुरुवातीला लहान मून रोव्हर घेऊन जाण्यासाठी तयार करण्यात आलं होतं. मात्र, नंतर अंतराळयानाचं वजन कमी करण्याचा विचार वगळण्यात आला. 


भारताचं चांद्रयान-3 चंद्रावर कधी उतरणार?


चांद्रयान-3 चं 14 जुलै रोजी श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रातून यशस्वीरत्या प्रक्षेपण पार पडलं. 1 ऑगस्ट रोजी चांद्रयानाला पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या कक्षेत जाण्यासाठी प्रवास सुरु केला. यानंतर आता चांद्रयान-3 यशस्वीरित्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत पोहोचलं आहे. चांद्रयान-3 ला ट्रान्सलुनर ऑर्बिट'मध्ये ठेवण्यात आलं आहे. इस्रोने यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान-3 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 चे चंद्रावर उतरेल. चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर 'सॉफ्ट लँडिंग' करण्याचा प्रयत्न करेल. चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी माहिती देताना सांगितलं होतं की, "जर सर्व काही ठीक पार पडलं तर चांद्रयान 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.47 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल."