न्यूयोर्क : जगभरात कोरोनाचे थैमान सुरु झाल्यानंतर त्याचा प्रसार रोखण्यासाठी लोकांना स्वच्छतेविषयी जागृत करण्यात आले. कोरोनाचा संसर्ग पृष्ठभागांवरुनही होत असल्याचे तज्ञांनी सांगितले होते. यातही संशोधकांनी प्लास्टिक किंवा स्टेनलेस स्टीलवर हा विषाणू काही दिवस जिवंत राहत असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे अशा पृष्ठभागांना स्पर्श केल्याने कोरोना विषाणूची बाधा होत असल्याचेही सांगितले होते. मात्र, या संदर्भात आता नवीन माहिती समोर आली आहे. 


अमेरीकेत कोरोनाचा प्रसार सुरु झाल्यानंतर किराणा दुकानं, औषधांची दुकानं, कार्यालये, मॉल्समध्ये सॅनिटायझेशन अनिवार्य करण्यात आले होते. न्यूयॉर्कच्या महानगर परिवहन प्राधिकरणाने दररोज रात्री मेट्रो गाड्या निर्जंतुक करण्यास सुरुवात केली होती. मात्र, ही स्वच्छता या आठवड्यात कदाचित अनधिकृतपणे संपली आहे. जेव्हा सी.डी.सी.ने त्यांच्या स्वच्छता संदर्भातील नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहे. दूषित पृष्ठभागास स्पर्श करण्यापासून विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका 10,000 मधील 1 पेक्षा कमी आहे.


“दूषित पृष्ठभाग आणि वस्तूंच्या संपर्कातून कोविड 19 कारणीभूत असलेल्या विषाणूचा लोकांना संसर्ग होऊ शकतो,” असे सी.डी.सी.चे संचालक डॉ. रोशेल वॅलेन्स्की यांनी सोमवारी व्हाईट हाऊसच्या ब्रीफिंगमध्ये सांगितले. मात्र, अशा पद्धतीने होणारा संक्रमणाचा धोका प्रत्यक्षात कमी असल्याचे पुराव्यांवरून दिसून आल्याचे त्यांनी सांगितले.”


व्हर्जिनिया टेक येथील हवाई जंतु विषाणू तज्ज्ञ लिन्से मार यांनी सांगितले, की "आम्हाला हे बर्‍याच काळापासून माहित आहे आणि तरीही लोक अद्याप पृष्ठभाग साफसफाईवर इतके लक्ष केंद्रित करीत आहेत." ती पुढे म्हणाली, की “दूषित पृष्ठभागाला स्पर्श करून कोविड 19 होत असल्याचे अद्याप पुरावे मिळाले नाहीत.


साथीच्या आजाराच्या सुरुवातीच्या काळात, अनेक तज्ञांचा असा विश्वास होता की व्हायरस प्रामुख्याने मोठ्या श्वासोच्छवासाच्या ड्रोपलेट्स पसरतो. हवेतून लांब पल्ल्यासाठी हे ड्रोपलेट्स खूपच जड आहेत. मात्र, ते वस्तू आणि पृष्ठभागावर पडतात. त्यातून कोरोना संसर्ग होत असल्याचा धोका त्यांनी सांगितला होता. त्यामुळे प्रत्येकजण वस्तू, पृष्ठभागाचे निर्जंतुकीकरणावर भर देत होते. असे करण्याने लोकांना आपल्याला कोरोना होणार नाही, असा विश्वास वाटतोय, असेही डॉ मार म्हणाले.