लंडन : भारतीय रश्मी सामंतची ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी स्टुडंट युनियनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी स्टुडंट युनियनच्या अध्यक्षपद मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. रश्मी सामंत विद्यापीठाच्या लिनॅक्रे कॉलेजमधून ऊर्जा प्रणाली या विषयावर एमएससी करत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीच्या निवडणुकीत रश्मीने 3,708 मतांपैकी 1,966 मते मिळवून जोरदार विजय मिळवला आहे.
रश्मी सामंतने कर्नाटकमधील मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण घेतले आहे. तिच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यातही भारतीय मुल्यांचा उल्लेख आहे. गुरुवारी ऑक्सफोर्ड एसयू लीडरशिप निवडणुकीत तिने परिसर वसाहतवाद मुक्तीआणि सर्वसमावेशकते वर भर दिला. निवेदनात तिने म्हटलं आहे की, ब्रिटनच्या पूर्ववर्ती वसाहतीतील बीएएमई (कृष्णवर्णीय, आशियाई व अल्पसंख्याक जातीय) वंचित गटांच्या संघर्षाबद्दल सहानुभूती आहे.
विद्यार्थी संघटनेची 2021-22 साठी अध्यक्ष म्हणून निवडून आलेली रश्मी सामंत हिच्या टीममध्ये आणखी काही भारतीय देखील आहेत. यामध्ये देविका उपाध्यक्ष ग्रॅज्युएट्स इलेक्ट आणि धिती गोयल स्टुडंट ट्रस्टीज इलेक्ट पदावर निवडली गेली आहे.
रश्मीने मणिपाल आणि उडुपी येथे तिचे शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. तिचे वडिल दिनेश सामंत यांचा परकलामध्ये व्यवसाय आहे. तर आई गृहिणी आहे. रश्मीने मणिपाल विद्यापीठात 2016 ते 2020 दरम्या आपलं शिक्षण पूर्ण केलं. रश्मी एमआयटी, मणिपालमध्ये विद्यार्थी परिषदेची तांत्रिक सचिव देखील होती.