लंडन : ब्रिटिश सत्तेचा सुवर्णकाळ आणि अस्ताला जाणाऱ्या साम्राज्याच्या साक्षीदार असलेल्या, ब्रिटिश राजघराण्याच्या सिंहासनावर सात दशके विराजमान असणाऱ्या ब्रिटनच्या महाराणी क्वीन एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांचं आज वृद्धपकाळानं निधन झालं. त्या 96 वर्षांच्या होत्या. स्कॉटलंडमधील बाल्मोरल कॅसल या ठिकाणी त्यांनी अंतिम श्वास घेतला. या दरम्यान राजपरिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. ब्रिटीश राजघराण्याकडून आणि ब्रिटन सरकारकडून त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. ब्रिटनसह जगातील अनेक देशांनी शोक व्यक्त केला आहे. एलिझाबेथ यांच्या पश्चात चार अपत्ये, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. एलिझाबेथ यांच्या निधनानंतर आता प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटनच्या गादीवर बसतील. 


 






एलिझाबेथ यांचा जन्म लंडनमध्ये 21 एप्रिल 1926 रोजी झाला. एलिझाबेथ यांचे शिक्षण घरातच झाले. एलिझाबेथ यांचे वडील जॉर्ज यांचे 1952 मध्ये निधन झाले. त्यानंतर एलिझाबेथ यांना 1952 मध्ये ब्रिटनची महाराणी म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर त्यांनी सलग सात दशके ब्रिटनची महाराणी म्हणून कामकाज पाहिले. एलिझाबेथ या जगात सर्वाधिक काळ सत्ता हाकणाऱ्या महाराणी आहेत. 


एलिझाबेथ यांचा विवाह प्रिन्स फिलीप यांच्यासोबत 1947 मध्ये झाला. मागील वर्षी, 9 एप्रिल 2021 मध्ये वयाच्या 99 व्या वर्षी त्यांचे निधन झाले होते. 


एलिझाबेथ यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली होती. मात्र, त्यांना वयोमानाप्रमाणे इतर आजारांचा सामना करावा लागत होता. 


फक्त ब्रिटनच्या महाराणी नाहीत


एलिझाबेथ या फक्त ब्रिटनच्या महाराणी नाहीत. ब्रिटीश राष्ट्रकुल परिषदेतील कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जमैका, बार्बाडोस, बहामास, ग्रेनेडा, पापुआ न्यू गिनी, सॉलोमन बेट समूह, तुवालू, सेंट लुसिया, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स, बेलिझ, ॲंटिगा आणि बार्बुडा, व सेंट किट्स आणि नेव्हिसया या 16 देशांची महाराणी होत्या. 


वाढते वय आणि प्रकृती अस्वास्थामुळे एलिझाबेथ यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने आली होती. फार मोजक्याच कार्यक्रमात त्या उपस्थित राहत होत्या. वयोमानामुळे त्यांच्या शारिरीक हालचालींवरही बंधने आली होती.