अस्ताना (कझाकस्तान) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची कझाकस्तानची राजधानी अस्ताना येथे भेट झाल्याची माहिती सुत्रांकडून समजते आहे. यावेळी दोघांनी एकमेकांचं अभिवादनही केलं.
सुत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांची भेट ही राष्ट्रप्रमुखांच्या लाउंजमध्ये झाली. यावेळी दोघांनी एकमेकांचं अभिवादन केलं. शरीफ यांच्यावर काही दिवसांपूर्वीच शस्त्रक्रियाही झाली. त्यानंतर मोदी आणि शरीफ यांची ही पहिलीच भेट आहे. त्यामुळे मोदींनी त्यांच्या तब्येतीची विचारपूसही केली. तसंच मोदींनी शरीफ यांच्या आईचीही विचारपूस केली.
पंतप्रधान मोदी शांघाई सहयोग संघटनच्या (SCO) शिखर संमेलनात सहभागी होणार आहेत. त्यासाठी ते कझाकस्तानमध्ये गेले आहेत. कझाकस्तानच्या राष्ट्रपतींनी SCO च्या सर्व नेत्यांना आज (गुरुवार) डिनरसाठी आमंत्रित केलं होतं. त्याआधी मोदी आणि नवाज यांची भेट झाल्याचं समजतं आहे.
दरम्यान, या कार्यक्रमात मोदी आणि नवाज हे एकाच मंचावर असण्याची शक्यता आहे. मात्र, असं असलं तरी दोन्ही देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून हे स्पष्ट करण्यात आलं आहे की, मोदी आणि शरीफ यांच्या भेटीचा कोणताही अधिकृत कार्यक्रम अद्याप निश्चित करण्यात आलेला नाही.
गेल्या अनेक महिन्यांपासून भारत-पाकच्या सीमेवर तणावचंं वातवरण आहे. पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधींच उल्लंघन करण्यात आलं आहे. तर कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेवरुन देखील दोन्ही देशातील संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळेच मोदी आणि नवाज यांच्या या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.