PORTUGAL Health Minister Resign : एका भारतीय महिलेच्या मृत्यूवरून पोर्तुगालमध्ये (PORTUGAL) खळबळ उडाली आहे. एवढेच नाही तर, महिलेच्या मृत्यूमुळे पोर्तृगालच्या आरोग्यमंत्री डॉ. मार्टा टेमिडो (Dr. Marta Temido) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पोर्तुगालची राजधानी लिस्बन इथल्या सर्वात मोठ्या हॉस्पिटलमध्ये महिलेला प्रसूतीगृहात बेड मिळाला नाही. यासाठी महिलेला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, तिथे हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेची जबाबदारी घेऊन पोर्तुगालच्या आरोग्य मंत्री मार्टा टेमिडो यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.   


पोर्तुगीज मीडिया रिपोर्ट्सनुसार, 34 वर्षीय गर्भवती भारतीय महिलेला राजधानी लिस्बनमधील सांता मारिया हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु, तेथील प्रसूती वॉर्डमध्ये बेड नसल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करता आले नाही. विशेष म्हणजे सांता मारिया हॉस्पिटल हे देशातील सर्वात मोठे रुग्णालय मानले जाते. सध्या या महिलेच्या मृत्यूप्रकरणी प्रशासकीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.


नेमकं प्रकरण काय? 


एक भारतीय गर्भवती महिला पर्यटनासाठी पोर्तृगालला गेली होती. या दरम्यान, महिलेला प्रसूती वेदना झाल्या. महिलेला ताबडतोब पोर्तुगालची राजधानी लिस्बन इथल्या सांता मारिया हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, तिथे महिलेला प्रसूतीगृहात बेड मिळाला नाही. या कारणास्तव तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, तिथे हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला. मात्र, महिलेच्या गर्भातील बाळाला वाचविण्यात डॉक्टरांना यश आले.


कोण आहेत डॉ. मार्टा टेमिडो? 


ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेची स्वत: जबाबदारी घेऊन पोर्तृगालच्या आरोग्यमंत्री डॉ. मार्टा टेमिडो यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. डॉ. मार्टा टेमिडो या 2018 पासून देशाच्या आरोग्य मंत्री होत्या. कोरोना (Covid-19) संकटातून पोर्तुगालला बाहेर काढण्याचं श्रेय त्यांना दिलं जातं. रुग्णालयाच्या प्रसूतीगृहात कर्मचारी कमी असल्याने अशा घटना याआधीही घडल्या होत्या. त्यामुळे भारतीय महिलेच्या मृत्यूनंतर मार्टा टेमिडो यांनी राजीनामा दिला. या पदावर राहण्यास आपण योग्य नसल्याचं सांगत त्या पायउतार झाल्या. 


विशेष म्हणजे, भारतात अशी एखादी घटना घडली की तिचं खापर एकमेकांवर फोडण्याचं राजकारण सुरु होतं. मात्र, त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारणारे राजकारणी दुर्मिळच असतात. आणि याच दुर्मिळ राजकीय नैतिकतेचं दर्शन मार्टा टेमिडो यांनी घडवलं आहे. 


महत्वाच्या बातम्या :