Heavy Rain in India and Pakistan : सध्या देशातील काही राज्यात मुसळधार (Heavy Rain) पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं नदी नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. देशातील बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडं आपला शेजारी देश पाकिस्तानात देखील पुरानं थैमान घातल आहे. पुरामुळं आत्तापर्यंत पाकिस्तानात 1 हजार 200 जणांचा मृत्यू झाला आहे. या पुरामुळं पाकिस्तानातील जनजीवन विस्कळीत झालं आहे.
गंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ, बिहारमधील लोकांच्या अडचणी वाढल्या
बिहारमध्येही मुसळधार पावसामुळं नवं संकट ओढवलं आहे. गंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळं बिहारमधील लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. मुसळधार पावसामुळे गंगा नदीची पाणी पातळी वाढली आहे. गेल्या आठवडाभरापासून पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असून, त्याचा परिणाम पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये दिसून येत आहे. किनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. सर्व घरे, रस्ते पाण्यात बुडाल्याची परिस्थिती आहे. लोक वाहतुकीसाठी बोटींचा वापर करत आहेत. मात्र सर्वांसाठी बोटींची व्यवस्था करणे हेही प्रशासनासमोरील मोठं आव्हान आहे. मुंगेरच्या कुतुलपूरच्या रस्त्यांवर तीन फुटांपेक्षा जास्त पाणी साचले आहे. लोकांना पाण्यातून जावे लागत आहे. पाण्याची पातळी आणखी वाढली तर लोकांना घरात राहणं कठीण होणार आहे.
पाटण्यात गंगेचं उग्र रुप
बिहारची राजधानी पाटण्यात गंगेने उग्र रुप धारण केले आहे. येथील पाण्याची पातळी वाढल्याने सखल भागात पुराचा धोका निर्माण झाला आहे. राजधानीच्या मौजीपूर येथील नदी पोलीस स्टेशनमध्ये जप्त केलेली शेकडो वाहने गंगेच्या पुरात बुडाली आहेत. मुसळधार पुराच्या वेळी वाहने वाहून जाऊ नयेत म्हणून पोलिसांनी वाहनांना दोरीने बांधले आहे.
उत्तराखंडच्या धारचुलामध्येही मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. हरदिया नाल्यातील भरावामुळे इथं बांधलेला पूल देखील वाहून गेला आहे. त्यानंतर आजूबाजूचे लोक अडचणीत आले आहेत. तसेच कर्नाटक राज्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. तिथेही या पावसामुळं मोठं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडं उत्तर प्रदेशमध्येही पावसानं कहर केला आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.
पाकिस्तानात पुराचा कहर
पाकिस्तानात मुसळधार पावसानं कहर केला आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी पूर आला आहे. य पुरामुळं पाकिस्तानात खूप मोठं नुकसान झालं आहे. पाकिस्तानमध्ये मुसळधार पावसामुळे सर्वत्र फक्त पाणीच पाणी दिसत आहे. तर पूरग्रस्त भागात हेलिकॉप्टरच्या माध्यमातून लोकांना वाचवण्यात येत आहे. पाकिस्तान सध्या इतिहासातील सर्वात भीषण पुराचा सामना करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Maharashtra Rain : महाराष्ट्रात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा 18 टक्के अधिक पाऊस, नाशिकसह वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद
- Maharashtra Rain : मुंबईसह पुणे रायगड आणि पालघरमध्ये पावसाची हजेरी, आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात यलो अलर्ट