लंडन : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य फरार आरोपी नीरव मोदीला अखेर अटक करण्यात आली आहे. कर्जबुडव्या नीरव मोदीला लंडनमध्ये बेड्या ठोकल्या आहेत. त्याला वेस्टमिंस्टर कोर्टात हजर केलं होतं. त्यानंतर  वेस्टमिंस्टर न्यायालयानं त्याला  जामीन नाकारत नऊ दिवसांची कोठडी सुनावली आहे.


नीरव मोदी हा 13 हजार कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याचा फरार आरोपी आहे. घोटाळा उघड होण्याआधीच त्याने भारतातून पळ काढला होता.


काही दिवसांपूर्वीच नीरव मोदीला पकडण्यासाठीवेस्टमिंस्टर कोर्टाकडून अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं. सीबीआयने इंटरपोल आणि यूके अथोरिटीजशी संपर्क करुन नीरव मोदीविरोधात रेड कॉर्नर नोटीसचा संदर्भ देत कारवाई करत त्याला अटक करण्याची मागणी केली होती. यानंतर नीरव मोदीला कधीही अटक होऊ शकते असं म्हटलं जात होत. अखेर आज त्याला अटक करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी नीरव मोदीचा लंडनमध्ये मुक्त संचार करत असल्याचं समोर आलं होतं. भारतातून पोबारा करुन गेलेला नीरव मोदी लंडनमध्ये बिनबोभाटपणे वावरत होता. 'द टेलिग्राफ' या लंडनमधील वृत्तपत्राने याबाबत दावा केला होता, तसेच त्यांनी नीरव मोदीशी बोलण्याचा प्रयत्नही केला होता.

दरम्यान लंडनमध्ये नीरव मोदीला अटक केल्यानंतर वेस्ट मिनिस्टर न्यायालयानं त्याला  जामीन नाकारत नऊ दिवसांची कोठडी सुनावली आहे. आता या प्रकरणावर 29 मार्चला सुनावणी होणार आहे. भारतीय तपासयंत्रणांच्या पाठपुराव्याला मिळालेलं हे मोठं यश मानलं जात आहे.

VIDEO | निरव मोदीच्या अलिशान महालावर डायनामाईटचा वार


कोण आहे नीरव मोदी?

नीरव मोदी भारतातील मोठे हिरे व्यापारी आहे. त्याला भारतातील 'डायमंड किंग' असंही संबोधलं जातं. 48 वर्षीय नीरव मोदी फोर्ब्जया जगभरातील श्रीमंतांच्या यादीत 84 व्या स्थानावर आहे. फोर्ब्जच्या आकडेवारीनुसार नीरव मोदीची जवळपास 12 हजार कोटींची संपत्ती आहे.

नीरव मोदी यांची फाईव्ह स्टार डायमंड नावाची कंपनी आहे. त्याने 'नीरव मोदी डायमंड ब्रँड' या नावाने भारतासह जगभरात ज्वेलरी शोरुम सुरु केली आहेत. दिल्ली, मुंबईपासून ते लंडन, हाँगकाँग आणि न्यूयॉर्कपर्यंत नीरव मोदींची 25 लग्झरी स्टोअर्स आहेत.

नीरव मोदीच्या ज्वेलरीची किंमत 10 लाखांपासून 50 कोटी रुपयांपर्यंत आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा 'नीरव मोदी डायमंड ब्रँड'ची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. केट विंसलेट आणि डकोटा जॉनसन यांच्यासारख्या हॉलिवूड अभिनेत्री नीरव मोदींच्या ज्वेलरीच्या ग्राहक आहेत. नीरव मोदीचे वडीलही हिरे व्यापारी आहेत. नीरव मोदींनी सुरुवातीचं शिक्षण अमेरिकेत घेतलं. अमेरिकेहून भारतात परतल्यानंतर व्यवसाय सुरु केला.

EXCLUSIVE | कर्जबुडवा नीरव मोदी एबीपीच्या कॅमेऱ्यात कैद


घोटाळा कसा झाला?

नीरव मोदी आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांनी आपल्या तीन कंपन्यांद्वारे हे षडयंत्र रचल्याचा आरोप आहे. तीन कंपन्यांच्या नावावर हाँगकाँगमधून सामान येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सामान मागवण्यासाठी लेटर ऑफ अंडरटेकिंगची मागणी बँकेकडे केली.

लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे मागवण्यात आलेल्या सामानाचे पैसे देण्याची जबाबदारी बँक घेत असल्याचं पत्र. हेच पत्र अलाहाबाद बँक आणि अॅक्सिस बँकेच्या हाँगकाँगमधल्या शाखांच्या नावावर काढण्याची मागणी केली. याद्वारे हाँगकाँगहून 280 कोटी रुपयांचं सामान मागवण्यात आलं.

पीएनबीने हाँगकाँगमधील अलाहाबाद बँकेला 5 आणि अॅक्सिस बँकेला 3 लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी केली आणि जवळपास 280 कोटी रुपयांचं सामान आणण्यात आलं. 18 जानेवारीला या तिन्ही कंपन्यांचे संबंधित अधिकारी पीएनबीच्या मुंबई शाखेत गेले आणि त्यांनी सामानाचे पैसे भरण्यास सांगितलं.

कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बँकेचं लेटर दाखवलं आणि पेमेंटची मागणी केली. जितके पैसे परदेशात पाठवायचे आहेत, तितकी कॅश भरायला  बँक अधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र बँकेने जेव्हा चौकशी केली तेव्हा त्यांची झोपच उडाली. कारण बँकेत एक रुपयाही न ठेवता या कंपन्यांनी लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी करायला लावल्याचं उघड झालं.

बँकेने तक्रार दाखल केली असून हे प्रकरण आता सीबीआयपर्यंत पोहोचलं आहे. नीरव मोदीला जारी केलेले आठही लेटर ऑफ अंडरटेकिंग बनावट असल्याचं उघड झालं. पीएनबीचे डेप्युटी मॅनेजर गोकुळनाथ शेट्टी यांनी एका कर्मचाऱ्याला हाताशी घेऊन हे लेटर जारी केल्याची माहिती आहे.

संबंधित बातम्या

नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा, लंडन कोर्टाकडून अटक वॉरंट जारी

नीरव मोदीवर सरकारचा सर्जिकल स्ट्राईक, अलिबागमधील बंगला जमीनदोस्त