Parag Agrawal Earning From Twitter : प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर (Twitter Deal) खरेदी केल्यानंतर पराग अग्रवाल (Parag Agrawal) यांची हकालपट्टी केली आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटरची सुत्रे हातात घेतल्यानंतर चार मोठ्या अधिकाऱ्यांना हटवलं आहे. यामध्ये भारतीय वंशाचे पराग अग्रवाल (ट्वीटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी) आणि विजय गड्डे यांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पराग अग्रवाल यांना एलॉन मस्क यांना मोठी रक्कम द्यावी लागणार आहे. पराग अग्रवाल ट्वीटरचे सीईओ म्हणून काम पाहत होते. त्यांना कंपनीकडून वार्षिक एक मिलियन डॉलरचं (7,50,54,500 रुपये) पॅकेज आणि बोनस देण्यात येत होता. बोनसशिवाय पराग यांना 12.5 मिलियन रिस्ट्रिक्टेड स्टॉक युनिटही दिले होते. त्यामुळे कामावरुन काढून टाकताना एलॉन मस्क यांना पराग अग्रवाल यांना मोबदला द्यावा लागणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार पराग अग्रवाल यांना 345 कोटी रुपयांचा मोबदला द्यावा लागणार आहे. 
 
एलॉन मस्क यांना द्यावे लागतील 42 मिलिअन डॉलर - 
रिसर्च फर्म इक्विलरनुसार, एलॉन मस्क यांना पराग अग्रवाल यांना 42 मिलियन डॉलर (345 कोटी रुपये) मोबदला द्यावा लागणार आहे. ट्विटरच्या प्रॉक्सीनुसार 2021 मध्ये पराग अग्रवाल यांचा एकूण मोबदला 30.4 मिलियन डॉलर इतका होता. पण ते सीईओ झाल्यानंतर त्यांचं वार्षिक वेतन 1 मिलियन डॉलर (9 कोटी 24 लाख) इतकं झालं होतं. न्यूयॉर्क टाईम्समधील वृत्तानुसार, पराग अगरवाल यांना जवळपास 60 दशलक्ष यूएस डॉलर्स (4,94 कोटी रुपये) मिळतील. पराग अग्रवाल यांना किती रक्कम मिळणार? याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही. पण एलॉन मस्क यांना पराग अग्रवाल यांना मोठी रक्कम द्यावी लागणार आहे. 


अग्रवाल यांची हकालपट्टी का?
ट्विटरवरील फेक अकाऊंटबाबत मस्क आणि ट्विटरच्या गुंतवणूकदारांची दिशाभूल केली असा ठपका ठेवत पराग अग्रवाल यांच्यासह चार मोठ्या अधिकाऱ्यांना हटवण्यात आलं. चीफ एक्झिक्युटिव्ह पराग अग्रवाल, चीफ फायनान्स ऑफिसर नेद सेगल आणि लीगल आणि पॉलिसी विभागाच्या प्रमुख विजया गड्डे यांचा समावेश आहे. 


गेल्यावर्षी अग्रवाल झाले होते सीएओ -
भारतीय वंशाचे पराग अग्रवाल गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये ट्विटरचे सीईओ झाले होते. जॅक डोर्सी यांनी राजीनामा दिल्यानंतर पराग अग्रवाल यांच्याकडे सुत्रे सोपवण्यात आली होती. पराग अग्रवाल यांनी आयआयटी बॉम्बे येथून बीटेकचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून  कॉम्प्युटर सायन्समध्ये पीएचडीचं शिक्षण घेतलं आहे. पराग अग्रवाल दशकभरापासून ट्विटरमध्ये काम करत होते. ट्विटरशिवाय पराग अग्रवाल यांनी याहू, माइक्रोसॉफ्ट आणि AT&T यासारख्या दिग्गज कंपनीमध्ये काम केलं आहे.