Pakistanis Anger On Petrol Price Hike: पाकिस्तानमध्ये पेट्रोलच्या किमती सातत्याने वाढत आहेत. एकाच आठवड्यात इंधनाच्या दरात दोनदा वाढ झाल्याने नागरिक रस्त्यावर उतरत निदर्शन करत आहेत. पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या सरकारच्या या निर्णयामुळे पाकिस्तानी जनता प्रचंड संतापली आहे. शुक्रवारी 3 जून रोजी कराचीच्या मध्य जिल्ह्यातील जुन्या भाजी मंडईजवळील पेट्रोल पंपावर लोकांनी तोडफोड आणि दगडफेक केली. 


पाकिस्तानमध्ये सध्या महागाई शिगेला पोहोचली असून, त्यावर सरकार सातत्याने इंधनाच्या किमती वाढवत आहे. एकप्रकारे श्रीलंकेची आर्थिक संकटासारखी परिस्थिती येथेही निर्माण होताना दिसत आहे. गुरुवारीच पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ताह इस्माइल यांनी पेट्रोलच्या दरात 30 रुपयांनी वाढ केल्याची घोषणा केली. यानंतर पेट्रोल 209 रुपये 86 पैसे आणि डिझेल 204 रुपये 15 पैशांवर पोहोचले आहे. त्यामुळे पाकिस्तानी जनता नाराज आहे. तेल दरवाढीमुळे जनताही तितकीच नाराज आहे. त्यावर पेट्रोल पंपाने पेट्रोल पुरवठा बंद केला आहे. पेट्रोल पंप मालकाच्या या निर्णयामुळे नागरिक आणखी संतप्त झाले. 


संपूर्ण पाकिस्तानात निदर्शने सुरू 


तेलाच्या वाढत्या किमतींमुळे संतप्त झालेल्या लोकांनी कराचीतील पेट्रोल पंपाची तोडफोड केली. याशिवाय लारकाना येथे लोकांनी इंधनाच्या किमती वाढवल्याचा निषेध केला. जिना बाग चौकात लोकांनी टायर पेटवल्याने परिस्थिती आणखीनच बिकट झाली.


दरम्यान, देशात निर्माण झालेल्या या आर्थिक संकटासाठी पंतप्रधान शाहबाज यांचे सरकार देशातील आधीच्या इम्रान खान सरकारच्या तहरीक-ए-इन्साफला जबाबदार धरत आहे. पाकिस्तानच्या सध्याच्या शाहबाज सरकारने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मागण्या मान्य करून देशातील इंधन सबसिडी रद्द करून पेट्रोलच्या दरात 30 रुपयांची वाढ केली आहे. मात्र, तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम कमी करण्यासाठी त्यांनी दर महिन्याला 28 अब्ज रुपयांचे मदत पॅकेजची घोषणा केली आहे. दरम्यान, रशियाने पाकिस्तानला तेल देण्यास नकार दिला आहे, मात्र अर्थमंत्र्यांनी याचा दोष आधीच्या सरकारवर टाकला. ते म्हणाले की, इम्रान सरकारने रशियाशी चांगले संबंध ठेवले नाहीत. त्यामुळे ही परिस्थिती आली आहे. ते म्हणाले की, इम्रान खान रशियाच्या दौऱ्यावर गेले होते. मात्र रशिया आणि पाकिस्तानमध्ये तेल करार झाल्याची कुठेही बातमी नाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या