Pakistan Audio Recording : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणि रिअल इस्टेट टायकून मलिक रियाझ हुसेन यांच्यातील कथित टेलिफोनिक संभाषणाचे ऑडिओ रेकॉर्डिंग समोर आले आहे. "गेल्या महिन्यात संसदेतील अविश्वास प्रस्तावापूर्वी पदच्युत पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan ) यांना झरदारी यांच्याशी तडजोडीसाठी संपर्क साधायचा होता, असे या रेकॉर्डिंगमध्ये म्हटले आहे. या ऑडिओमध्ये  झरदारी आणि रियाझ यांचा आवाज असल्याचे 32 सेकंदांचे ऑडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


अलीकडेच इम्रान खान यांनी इस्लामाबादमध्ये आझादी मार्च काढला होता. यावेळी हे रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहे. यामध्ये पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यातील करारानुसार हा मोर्चा मागे घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. 


डॉन वृत्तपत्राने याबाबचे वृत्त दिले आहे. व्हायरल झालेल्या या कथित संभाषणात रियाझ झरदारींना सांगत असल्याचे ऐकू येते की, इम्राण खान त्यांना संदेश पाठवत आहेत. रियाझ यांच्या कथित आवाजात पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतींना सांगितले की, "आज त्यांनी (इमरान खान) खूप संदेश पाठवले आहेत." त्यानंतर प्रत्युत्तरात झरदारी म्हणतात, "आता ते अशक्य आहे." तेव्हा रियाझ म्हणतात, "ठीक आहे. मला हे तुमच्या लक्षात आणून द्यायचे होते." असे डॉनच्या अहवालात म्हटले आहे. 


दरम्यान, डॉनच्या अहवालात असे म्हटले आहे की, तेहरीक-ए-इन्साफने (पीटीआय) ही ऑडीओ क्लिप "बनावट" असल्याचे म्हटले आहे. परंतु झरदारी यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) च्या सदस्यांनी  ही ऑडीओ क्लिप खरी असल्याचे म्हटले आहे.


एक्सप्रेस ट्रिब्यून या वृत्तपत्राने पीटीआय नेते शाहबाज गिल यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, "एक व्यावसायिक व्यक्तिमत्व आणि इम्रान खान विरोधी राजकारणी चर्चा करत आहेत, याचे श्रेय इम्रान खान यांना दिले जात आहे. परंतु, या संभाषणाचा सद्य परिस्थितीशी काहीही संबंध नाही." असे असले तरी या ऑडीओ क्लिपमुळे पाकिस्तानच्या राजकारणात आता चागंलीच खळबळ उडाली आहे.