Pakistan Imran Khan : मागील काही महिन्यांपासून पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या राजकीय संघर्षाचा महत्त्वाचा टप्पा आज पार पडणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारविरोधात विरोधकांनी अविश्वास मत प्रस्ताव दाखल केला आहे. नॅशनल असेंब्लीमध्ये आज सायंकाळी अविश्वास मत प्रस्तावावर चर्चा सुरू होणार आहे. या प्रस्तावावर आजच मतदान होण्याची शक्यता आहे.  इम्रान खान यांचे सरकार कोसळणार असल्याची चर्चा सुरू आहे. 


पाकिस्तानच्या संसदेत अविश्वास मताच्या ठरावाला सामोरे जाण्याआधी रविवारी इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. परेड ग्राउंडमध्ये झालेल्या सभेत इम्रान खान यांनी सरकारने केलेल्या कामांची यादी मांडत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. पाकिस्तानचे सरकार पाडण्यासाठी परदेशी शक्तींचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही खान यांनी केला. आपण कोणत्याही परिस्थिती राजीनामा देणार नसल्याची गर्जना इम्रान यांनी यावेळी केली. 


बहुमताचे आकडे काय सांगतात?


इम्रान खान यांना सत्ता वाचवण्यासाठी 172 खासदारांचा पाठिंबा हवा. मात्र, त्यांच्याच पक्षातील 39 खासदारांनी बंडाळी केली आहे. त्यामुळे इम्रान खान यांचे सरकार अल्पमतात आले आहे. सत्तेत कायम राहण्यासाठी इम्रान खान यांना मोठे डावपेच आखावे लागणार आहेत. 


इस्लामाबादमध्ये आज विरोधी पक्षांचा मोर्चा


महागाईसह जनतेला भेडसावत असलेल्या विविध मुद्यांवर इम्रान खान यांचे सरकार अपयशी ठरले असल्याचा हल्लाबोल विरोधी पक्षांनी केला. मागील वर्षी विरोधी पक्षांनी एकत्र येत सरकारविरोधात आघाडी उघडली होती. 


अविश्वास मत ठराव दाखल करण्याआधी विरोधी पक्षांनी राजधानी इस्लामाबादमध्ये मोर्चा काढला आहे. पीडीएमचे अध्यक्ष मौलाना फजलुर रहमान यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह इस्लामाबादमध्ये ठिय्या मांडला आहे. जमात-ए-उलेमा-इस्लामच्या बॅनरअंतर्गत मौलाना फजलुर रहमान यांनी इम्रान खान यांच्यावर सडकून टीका केली. इम्रान खान यांनी आपल्या भाषणात वापरलेली भाषा शोभनीय नव्हती. लोकांसमोर उजळ माथ्याने जाण्याची पात्रता नसलेली लोक आता 'रियासत-ए-मदीना' सारख्या शब्दाचा वापर करतात हे हास्यास्पद आहेत, असेही त्यांनी म्हटले.


बिलावल भुट्टो, मरियम शरीफ ही मैदानात 


पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज या पक्षानेदेखील लाहोरपासून मोर्चाला सुरुवात केली आहे. आज इस्लामाबादमध्ये हा मोर्चा दाखल होणार आहे. या मोर्चाने नेतृत्व मरियम शरीफ, हमजा शरीफ करत आहेत. या मोर्चाला भुट्टो यांचा पक्ष पीपीपीचा पाठिंबा मिळत आहे. बिलावल भुट्टो यांनीदेखील इम्रान सरकारविरोधात हल्लाबोल सुरू केला आहे.