इस्लामाबाद : सध्या पाकिस्तानमधील राजकीय परिस्थिती ठीक नाही. पंतप्रधान इम्रान खान यांना पदावरुन हटवण्यासाठी त्यांच्याच पाकिस्तान तहरीक-ए इन्साफच्या अनेक खासदारांनी विरोधकांसोबत हातमिळवणी केली आहे. लवकरच इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचीही तयारी केली जात आहे. या प्रस्तावाआधीच पीटीआयच्या अनेक खासदारांनी इम्रान खान यांच्याविरोधात नाराजी दाखवण्यास सुरु केलं आहे. अविश्वास प्रस्तावाआधी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफच्या 24 खासदारांनी इस्लामाबादच्या सिंध हाऊसमध्ये आश्रय घेतला आहे.
इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाच्या अनेक खासदारांनी गुरुवारी (17 मार्च) पंतप्रधान म्हणून त्यांना असलेला पाठिंबा मागे घेतला आहे. त्यामुळे आता इम्रान पदावरुन बेदखल होण्याची शक्यता आणखीच वाढली आहे. एक दिवस आधी इम्रान खानच्या प्रमुख सहकाऱ्यांनी म्हटलं होतं की, "पंतप्रधान लवकरच आपल्या सहकाऱ्यांचं पाठिंबा गमावू शकतात. त्यानंतरच ही राजकीय उलथापालथ होण्यास सुरुवात झाली."
महत्त्वाचं म्हणजे आजपर्यंत पाकिस्तानच्या एकाही पंतप्रधानाला आपला कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही.
विरोधकांनी इम्रान खान यांच्यावर अर्थव्यवस्था आणि पराराष्ट्र धोरण नीट हाताळत नसल्याचा आरोप केला आहे. तर माझे पंतप्रधानांसोबत मतभेद आहेत, असं इम्रान खान यांच्या पक्षाचे खासदार राजा रियाज यांनी जियो टीव्हीशी बोलताना म्हटलं. रियाज यांनी दावा केला आहे की, "20 पेक्षा जास्त खासदार पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर समाधानी नाहीत. अविश्वास प्रस्तावाच्या वेळी हे सर्व खासदार आपल्या विवेकबुद्धीनुसार मतदान करतील."
यासोबतच रियाज यांनी पाकिस्तानचा प्रमुख विरोधी पक्ष पाकिस्तान पीपल्स पार्टीला अनेक सत्ताधारी खासदारांचं समर्थन मिळाल्याचा दावा केला आहे. एक व्हिडीओ दाखवून त्यांनी म्हटलं की, अनेक सत्ताधारी खासदार सध्या पीपीपीच्या कार्यालयात दिसतात.
तीन राजकीय पक्षांची इम्रान खान यांच्याविरोधात मोहीम
इम्रान खान यांच्याविरोधात पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाजचे अध्यक्ष शहाबाज शरीफ, पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सहअध्यक्ष आसिफ अली झरदारी आणि जमियत उलेमा-ए-फज्लचे अध्यक्ष फजलूर रहमान यांनी मोहीम सुरु केली आहे. इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी तीन पक्षांनी हातमिळवणी केली आहे.
आकडे काय सांगतात?
अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला तर संसदेच्या खालच्या सभागृहातील एकूण 342 पैकी 172 सदस्यांचं समर्थ आवश्यक आहे. इम्रान खान यांना नॅशनल असेम्ब्लीमध्ये अजूनही बहुमत आहे. ज्यात पीटीआयके 155 सदस्य आणि युतीचे 23 सदस्यांचा समावेश आहे. तर विरोधी पक्षाचे 163 सदस्य आहे. त्यामुळे सत्ताधारी युतीमधील काही नाराज सदस्य इम्रान यांना सत्तेपासून दूर करण्यासाठी आपली साथ देती अशी विरोधकांना अपेक्षा आहे. क्रिकेटर ते राजकारणी असा प्रवास केलेले इम्रान खान 2018 मध्ये सत्तेत आले. पुढील सर्वसाधारण निवडणुका 2023 मध्ये होणार आहेत.