इस्लामाबाद : तालिबानचा 'गॉडफादर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मौलाना समी-उल हकची पाकिस्तानात हत्या झाली आहे. समी-उल हकची शुक्रवारी रावळपिंडीमध्ये हत्या करण्यात आली. पाकिस्तानमध्ये हक धार्मिक नेता म्हणूनही प्रसिद्ध होता. इतकंच नाही तर तो माजी खासदारही होता. कट्टरवादी राजकीय पक्ष जमात उलेमा-ए-इस्लाम-समीचा (जेयूआई-एस) तो प्रमुख होता.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी समी-उल हकच्या हत्येच्या तपासाचे आदेश दिले आहेत. इम्रान खान सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. "पाकिस्तानच्या सेवेसाठी ते कायम स्मरणात राहतील. देशाने एक प्रमुख धार्मिक नेता गमावला आहे," अशी प्रतिक्रिया खान यांनी व्यक्त केली.

हकची हत्या रावळपिंडीमधील त्यांच्या निवासस्थानी झाली. समी-उल हकच्या कुटुंबीय आणि पक्षाच्या नेत्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. "हल्लेखोरांनी चाकूने भोसकून त्यांची हत्या केली," अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. हकचा मुलगा मौलाना हमीदुल हकने सांगितलं की, "ते इस्लामाबादमध्ये एका आंदोलनात सहभागी होण्यासाठी जात होते. पण रस्ता बंद असल्याने घरी परतले. आपल्या खोलीत आराम करत असल्याने त्यांचा चालक/सुरक्षारक्षक काही वेळासाठी बाहेर गेला. चालक परत आला असता, त्याने मौलानाला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं पाहिलं."

हकच्या पक्षातील एका नेत्याने सांगितलं की, "ज्यावेळी मौलानाची हत्या झाली, तेव्हा घरात त्यांच्याशिवाय कोणीही नव्हतं. त्यामुळे त्यांची हत्या कोणी केली, याबाबत अद्याप सांगू शकत नाही."