मुंबई : पाकिस्तानचा राजकीय इतिहास गोंधळाचा असल्याची प्रचिती वारंवार येत असून आताही माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गोळीबाराची घटना घडली आहे. पाकिस्तान स्वातंत्र्य झाल्यापासून, म्हणजे 1947 सालापासून आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे, अनेकांवर गोळीबार करण्यात आली आहे. पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांचीही गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. आता माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. 


पाकिस्तानच्या पहिल्या पंतप्रधानांची हत्या


पाकिस्तान स्वातंत्र्य झाल्यानंतर लियाकत अली खान (Liaqat Ali Khan) हे त्या देशाचे पहिले पंतप्रधान झाले. त्यांच्यावर रावळपिंडीतील कंपनीबागल या ठिकाणी गोळीबार झाला आणि त्यांना ठार मारण्यात आलं. ज्या कंपनीबाग इथे हा हल्ला करण्यात झाला होता ज्याला नंतर लियाकत बाग असं नाव देण्यात आलं.


झुल्फिकार अली भुट्टो यांना फासावर चढवण्यात आलं 


झुल्फिकार अली भुट्टो हे पाकिस्तानातील मोठं राजकीय नाव. पाकिस्तानवर जनरल झिया उल हक यांचं लष्करी सरकार सत्तेत आल्यानंतर झुल्फिकार अली भुट्टो यांना फाशीवर चढवण्यात आलं. रावळपिंडीतील लियाकत बाग याच ठिकाणीपासून काही अंतरावरच झुल्फिकार अली भुट्टो यांना फाशीवर चढवण्यात आलं. 


भुट्टो यांच्या मृत्यूच्या नऊ वर्षानंतर त्यांना फाशीवर चढवणाऱ्या जनरल झिया-उल-हक यांचा विमान अपघतात मृत्यू झाला. याबाबत आजही उलटसूलट चर्चा होत आहेत. 


दोन वेळ पंतप्रधान राहिलेल्या बेनिझिर भुट्टो यांची हत्या 


बेनिझिर भुट्टो (Benazir Bhutto) या पाकिस्तानच्या दोन वेळा पंतप्रधान राहिल्या होत्या. त्यांना सातत्याने ठार मारण्याच्या धमक्या येत होत्या. 27 डिसेंबर 2007 रोजी, रावळपिंडीत एका रॅलीमध्ये असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये भुट्टो यांचा मृत्यू झाला. बेनिझिर भुट्टो या पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. तसेच त्या झुल्फिकार अली भुट्टो यांच्या कन्या होत्या. 


बेनिझिर भुट्टो यांचे पती म्हणजे असिफ अली झरदारी यांनी भुट्टो यांचे शव विच्छेदन करु दिलं नव्हतं. त्यामुळे त्यांच्या हत्येचं गुढ कायम राहिलं आणि हल्लेखाराला शेवटपर्यंत पकडता आलं नाही. 


इम्रान खान यांच्यावर गोळीबार 


पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी सरकारविरोधात लॉंग मार्चचं आयोजन केलं होतं. त्यांच्या या लॉंग मार्चला लोकांमधून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत होता. आज गुजरानवाला या ठिकाणी रॅलीमध्ये असताना इम्रान खान यांच्यावर चार ते पाच जणांनी गोळीबार केला. या गोळीबाराच्या घटनेत इम्रान खान यांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांना लाहोर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आता त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगितलं जातंय. 


पाकिस्तानचा इतिहास पाहता राजकीय नेत्यांवर होणारा गोळीबार, त्यांची हत्या हे काही नवीन नाही. तसेच इम्रान खान यांच्यावर झालेला गोळीबारही काही शेवटचा नसेल हे नक्की. एकूणच पाकिस्तानची सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे.