नवी दिल्ली : पाकिस्ताननं गुरुवारी आंतरराष्ट्रीय न्यायालय विधेयक 2020 ला मंजुरी दिली आहे.  पाकिस्तानच्या संसदेत हे विधेयक मंजूर करण्यात आलं. या अध्यादेशानंतर आता कुलभूषण जाधव यांना आता शिक्षेविरोधात कोणत्याही उच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार मिळाला आहे. 


आंतरराष्ट्रीय न्यायालयीन कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी इम्रान खान सरकारने 'पुनरावलोकन व पुनरावलोकन' करण्याचा अधिकार प्रदान करण्यासाठी संसदेत हे विधेयक सादर केलं होतं. हे आंतरराष्ट्रीय न्यायालय विधेयक 2020 पाकिस्तानच्या संसदेत बहुमतानं पास करण्यात आलं आहे. 


आंतरराष्ट्रीय कोर्टानं (ICJ) जुलै 2019 मध्ये देण्यात आलेल्या एका निर्णयात म्हटलं होतं की, जाधव यांच्या शिक्षेचा पाकिस्तानने प्रभावीपणे आढावा घेऊन पुनर्विचार करायला हवा. तसेच, यापुढे कोणतीही उशीर न करता भारताला समुपदेशक प्रवेश दिला जावा. त्याचवेळी, या प्रकरणात स्वतंत्र आणि न्यायाधीश सुनावणीसाठी भारतीय वकीलाची नेमणूक करण्याची मागणी भारताकडून वारंवार करण्यात येत होती. परंतु पाकिस्तान वारंवार ही मागणी फेटाळून लावत होतं. 


फाशीला आंतरराष्ट्रीय कोर्टात आव्हान 


भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव सध्या पाकिस्तानमधील तुरुंगात कैद आहेत. कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सैन्याने 3 मार्च 2016 रोजी हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपात बलुचिस्तानमधून अटक केली होती, असा पाकिस्तानचा दावा आहे. मात्र भारताने वारंवार हा दावा फेटाळला आहे. कुलभूषण जाधव निवृत्ती घेऊन बिझनेच्या निमित्ताने इराणला गेले होते. तिथे पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनी त्यांचं अपहरण केलं होतं, असं भारताचं म्हणणं आहे.


पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना एप्रिल 2017 मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. याविरोधात भारताने मे 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं दार ठोठावलं होतं. पाकिस्तानने जाधव यांना काऊन्सलर न दिल्याचा आरोप भारताने केला हाता. भारताने पाकिस्तानी सैन्याच्या जाधव यांच्याविरोधातील खटल्याला आव्हानही दिलं होतं. ज्येष्ठ विधीज्ञ हरिश साळवे यांनी कुलभूषण जाधव यांची बाजू आंतरराष्ट्रीय कोर्टात मांडली होती.


जाधव यांच्या फाशीला स्थगिती


यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने 18 मे 2017 रोजी पुढील कोणताही निर्णय येईपर्यंत पाकिस्तानने कारवाई करु नये, असं सांगत कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने 18 ते 21 फेब्रुवारी 2019 दरम्यान चार दिवस सुनावणी केली होती. यावेळी भारत आणि पाकिस्तानने आपापला युक्तिवाद मांडला होता.


कोण आहेत कुलभूषण जाधव?


'रॉ'चे हेर असल्याचा आरोप करत कुलभूषण जाधव यांना बलुचिस्तान प्रांतातून 3 मार्च 2016 मध्ये अटक झाली होती. जाधव कुटुंबिय मूळचे सांगलीतील असून, सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. कुलभूषण यांचे वडील मुंबई पोलीस दलाचे माजी कर्मचारी आहेत. जाधव यांनी नौदलातून निवृत्ती स्विकारुन व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यामुळे आपला मुलगा हेर असल्याचा आरोप जाधव कुटुंबियाने फेटाळून लावला आहे. 'माझ्या मुलाला यात अडकवण्यात आलं आहे. कुलभूषण इराणच्या चबाहारमध्ये सल्लागार म्हणून व्यवसाय करतो,' असं त्यांचे वडील म्हणाले होते.