Imran Khan Announces to Resume Long March : पाकिस्तानचे ( Pakistan ) माजी पंतप्रधान आणि तेहरीक-ए-इंसाफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान ( Imran Khan ) यांनी घोषणा केली आहे की, मंगळवारी 8 नोव्हेंबर रोजी इस्लामाबादच्या दिशेने पुन्हा एकदा लाँग मार्च ( Long March ) काढण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात लाँग मार्च दरम्यान त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. गुरुवारी (3 नोव्हेंबर) पंजाब प्रांतात ही घटना घडली. हल्लेखोराने इम्रान खान यांच्यावर गोळीबार केला. पण त्याचा नेम चुकला आणि इम्रान खान यांच्या पायाला गोळी लागली. वजीराबाद (Wazirabad) येथून इस्लामाबादच्या दिशेने सरकारच्या निषेधार्थ लाँग मार्च काढण्यात आला होत्या. त्यावेळी इम्रान यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता.
'जिथे माझ्यावर गोळीबार झाला तिथूनच पुन्हा मोर्चा काढणार'
तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी आता सांगितलं आहे की, येत्या मंगळवारपासून (8 नोव्हेंबर) ते पुन्हा इस्लामाबादच्या दिशेने लाँग मार्च काढण्यात येणार आहेत. यासोबत इम्रान खान यांनी म्हटलं आहे की, ज्या ठिकाणी माझ्यावर गोळीबार झाला होता त्याच ठिकाणाहून पुन्हा लाँग मार्च सुरू करण्यात येणार आहे. वजीराबादमधील अल्लाहू चौकाजवळ इम्रान खान यांच्यावर हल्ला झाला होता. हल्लेखोरांनी त्यांच्या कंटेनरजवळ त्यांच्या गोळीबार केला होता.
काय म्हणाले इम्रान खान?
पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, एका पत्रकार परिषदेत इम्रान खान म्हणाले की, 'वजीराबादमधील ज्या ठिकाणी माझ्यावर आणि अन्य 11 जणांना गोळीबार करण्यात आला त्याच ठिकाणाहून मंगळवारी आमचा मोर्चा पुन्हा सुरू होईल. गोळीबारात मोअज्जमचा मृत्यू झाला.'
इम्रान खान यांनी त्यांच्या पक्षाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे की त्यात त्यांनी सांगितलंय, 'मी लाहोरमध्ये आमच्या मोर्चाला संबोधित करेन आणि आमचा मोर्चा येत्या 10 ते 14 दिवसांत रावळपिंडीला पोहोचेल.' इम्रान पुढे म्हणाले की, मोर्चा रावळपिंडीला पोहोचला की ते तिथे ते मोर्चात सामील होतील आणि स्वतः मोर्चाचं नेतृत्व करतील.
जीवघेण्या हल्ल्याबाबत काय म्हणाले इम्रान खान?
गुरुवारी झालेल्या गोळीबारात इम्रान खान यांच्या दोन्ही पायाला मार लागला होता. यानंतर त्यांना लाहोरमधील शौकत खानम रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्ल्याच्या एका दिवसानंतर इम्रान खान यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की, 'माझ्यावर हल्ला होणार हे मला आधीच माहित होतं'. प्राणघातक हल्ल्यानंतरच्या आपल्या पहिल्या भाषणात इम्रान खान म्हणाले होते की, 'रॅलीला जाण्याच्या एक दिवस आधी मला माहित होते की माझ्याविरोधात वजिराबाद किंवा गुजरातमध्ये हल्ल्याचा कट रचला जात आहे.'