कराची: आपल्यावर हल्ला होणार असल्याचा अंदाज आधीच होता, ठार मारण्याचं षडयंत्र आधीच रचण्यात आलं होतं असा थेट आरोप पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. तीन लोकांनी आपल्याला ठार मारण्याचा कट रचला आणि आपल्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्याचंही ते म्हणाले. सध्याचं सरकार हे सर्वाधिक भ्रष्टाचारी सरकार असून त्याच्यामुळेच पाकिस्तानवरच्या कर्जाचा बोजा वाढला आहे असा आरोपही इम्रान खान यांनी केला. जीवघेण्या हल्ल्यानंतर इम्रान खान यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 


तीन लोकांनी ठार मारण्याचा प्रयत्न केला 


इम्रान खान यांनी त्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्यांची नावं जाहीर केली आहेत. आपल्यावर हल्ला करण्याचा कट एका बंद खोलीत रचण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, तीन लोकांनी आपल्याला ठार मारण्याचा कट रचला. यामध्ये शाहबाज शरीफ, राणा सन्नाउल्ला आणि मेजर जनरल फैजल यांचा समावेश आहे.


निवडणूक आयोगाचा पक्षपातीपणा 


पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा केल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला. इम्रान खान म्हणाले की, "आपल्याला निवडणुकीत हरवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले, त्यामध्ये निवडणूक आयोगानेही विरोधकांना मदत केली. आम्ही ईव्हीएमच्या माध्यमातून मतदान घेण्यात यावं अशी मागणी केली. पण निवडणूक आयोगाने ती नाकारली."


 




अमेरिकेचा दबाव आला आणि... 


अमेरिकेच्या दबावानंतर आपल्याला हटवण्यात आलं असल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला. ते म्हणाले की, "मार्चमध्ये अमेरिकेचा दबाव आला, इम्रान खानला पदावरुन हटवा असा आदेश अमेरिकेतून देण्यात आला. त्यानंतर माझ्यावर अविश्वास ठराव आणण्यात आला. मी 22 वर्षे संघर्ष केला आणि सत्तेत आलो. लोकांनी मला भरभरुन प्रेम दिलं."


इम्रान खान म्हणाले की, "आमच्या पक्षाला ज्या लोकांनी आर्थिक मदत केली त्यांना त्रास दिला जातोय. त्यांना देश सोडून जाण्यास भाग पाडलं जातंय. आम्ही पैसा कुठून आणला हा प्रश्न विचारणाऱ्यांनी त्यांच्या पक्षाला पैसा कोणी दिला याची आधी माहिती द्यावी."


पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गुरुवारी गोळीबार करण्यात आला. गुजरानवाला या ठिकाणच्या त्यांच्या रॅलीत त्यांच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्या. हा हल्ला चार ते पाच जणांनी केला असून त्यापैकी एकाला पोलिसांनी अटक केली. आपण इम्रान खान यांना ठार मारण्यासाठीच आलो असल्याचं या हल्लेखोरानं कबुल केलं आहे. 


इम्रान खान यांची प्रकृती सध्या स्थिर असून ते धोक्याच्या बाहेर आहेत. इम्रान खान यांनी आज व्हिडीओच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला असून त्यांनी आपल्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांवर केला आहे.