Imran Khan Attacked : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान ( Pakistan Former PM ) इम्रान खान ( Imran Khan ) यांनी त्यांच्यावरील प्राणघातक हल्ल्यामागे पंतप्रधान शाहबाज शरीफ ( Pakistan PM Shehbaz Sharif ) सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप केला आहे. इम्रान खान यांनी म्हटलं आहे की, माझ्यावर झालेल्या हल्ल्यामागे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि गुप्तचर यंत्रणांचा हात आहे. इम्रान खान यांनी 26 नोव्हेंबर रोजी एका रॅलीमध्ये वक्तव्य करताना हे गंभीर आरोप केले आहेत. इम्रान खान यांनी यावेळी गंभीर आरोप करत म्हटलं आहे की, तीन आरोपी मला पुन्हा निशाणा बनवण्याचा प्रयत्न करत आहेत.
पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (PTI) पक्षाची शनिवारी रावळपिंडीत रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीला संबोधित करताना इम्रान खान यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख केला. यावेळी इम्रान खान यांनी म्हटलं की, माझा मृत्यूशी जवळून सामना झाला होता आणि माझ्यावर हल्ला झाला तेव्हा माझ्या डोक्यावरून नजरेसमोर गोळ्या चालवल्या जात होत्या.' हल्ल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिलेल्या पहिल्या भाषणात खान यांनी आरोप केला की, तीन गुन्हेगार माझ्यावर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत आहेत.
इम्रान खान यांनी शनिवारी रॅलीदरम्यान तीन जणांची नावं घेत गंभीर आरोप केला आहे की, आपल्यावरील हल्ल्यामागे पंतप्रधान शहबाज शरीफ, गृहमंत्री राणा सनाउल्ला आणि आयएसआयच्या 'काउंटर इंटेलिजन्स विंग'चे प्रमुख मेजर-जनरल फैसल नसीर यांचा हातआहे.
इम्रान खान यांच्यावर प्राणघातक हल्ला
इम्रान खान यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. पंजाब प्रांताततील एका रॅली दरम्यान त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. यावेळी त्यांच्या पायाला गोळी लागली होती. या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता, तर इम्रान खान यांचे काही कार्यकर्तेही जखमी झाले होते. या हल्ल्यामागे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या हात असल्याचा आरोप इम्रान खान यांच्याकडून वारंवार करण्यात येत आहे. आता शनिवारी पुन्हा त्यांनी याचा पुनरुच्चार केला.
इम्रान खान यांनी त्यांच्या समर्थकांना संबोधित करताना म्हटलं की, 'तुम्हाला मोकळेपणाने जगायचे असेल तर मृत्यूची भीती वाटू देऊ नका. भय संपूर्ण देशाला गुलाम बनवतं'. कर्बलाच्या लढाईचा संदर्भ देत त्यांनी पुढे म्हटलं की, जिथे प्रेषित मोहम्मद यांचे नातू इमाम हुसेन आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या काळातील अत्याचारी शासकाविरोधात लढा देत आवाज उठवला म्हणून मारण्यात आलं.