Imran Khan Attacked : पाकिस्तानचे ( Pakistan ) पंतप्रधान शाहबाज शरीफ ( PM Shahbaz Sharif ) यांनी इतरांसोबत मिळून इम्रान खान ( Imran Khan ) यांच्या हत्येचा कट रचला होता, असा आरोप इम्रान खान यांचे विशेष सल्लागार रऊफ हसन ( Rauf Hassan ) यांनी केला आहे. इम्रान खान यांचे विशेष सल्लागार रऊफ हसन यांनी एबीपी न्यूजशी विशेष संवाद साधताना गंभीर आरोप केला आहे की, पंतप्रधान शाहबाज शरीफ, गृहमंत्री राणा सनाउल्ला आणि मेजर जनरल फैसल यांनी इम्रान खान यांच्या हत्येचा कट रचला होता. या तिघांवरही हत्येचा कट रचल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर, दुसरीकडे इम्रान खान लोकांना भडकावण्याचा प्रयत्न करत असल्याने हल्ला केल्याचे अटक केलेल्या हल्लेखोरानं म्हटलं आहे.
दरम्यान, इम्रान खान यांनी पीटीआय नेते असद उमर यांना रुग्णालयात बोलावले आणि इम्रान यांच्या वतीने वक्तव्य जारी करण्यास सांगितलं आहे. त्यानुसार इम्रान खान यांनी असद यांना सांगितलं की, आता सरकारच्या निषेधार्थ सुरु असलेलं 'लाँग मार्च' आंदोलन ठराविक काळासाठी त्यांची जबाबदारी असेल. असद उमर यांनी पुढे सांगितलं की, इम्रान खान यांनी आपल्या हत्येच्या प्रयत्नामागे तीन लोकांवर आरोप केले आहेत. इम्रान यांनी यांच्या हत्येची योजना शाहबाज शरीफ, राणा सनाउल्ला आणि एक उच्च लष्करी अधिकारी (जनरल फैसल) यांनी आखली होती, असा गंभीर आरोप इम्रान खान यांनी केला आहे. ही माहिती असद उमर यांनी एबीपी न्यूजशी बोलताना दिली आहे.
माझ्या हत्येचा कट रचला जातोय : इम्रान खान
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी काही दिवसांपूर्वी दावा केला होता की, काही जण माझ्या हत्येचा कट रचत आहेत. एका टेपमध्ये त्यांनी चार जणांची नावं असल्याचंही सांगितलं. त्यांना काही झाले तर ते कट रचणाऱ्यांची नावं उघड करतील, असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र, त्याच्या हत्येचा कट रचल्याचा दावा करण्याची इम्रान यांची ही पहिलीच वेळ नाही.
इम्रान खान यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचे दावे अनेक वेळा स्वत: इम्रान आणि त्यांच्या पक्षाकडून याआधीही करण्यात आले आहेत. वारंवार अशा प्रकारच्या दाव्यांमुळे पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इम्रान खान यांच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सध्या इम्रान खान यांच्या सुरक्षेत 100 हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत.