Pakistan Floods : पाकिस्तावर आभाळ फाटलं असून महापूरामुळे लाखो नागरिकांना फटका बसला आहे. आधीच आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानवर नैसर्गिक संकट ओढावल्याने सरकार समोरील आव्हानात वाढ झाली आहे. पाकिस्तानमध्ये यंदा विक्रमी पाऊस बरसला असून त्यामुळे अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. पाकिस्तानमधील 110 जिल्ह्यात पावसामुळे गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. या पुरात एक हजारांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. तर, 10 लाखांहून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. पाकिस्तान सरकारने राष्ट्रीय आणीबाणी लागू केली आहे.
पाकिस्तानी वृत्तवाहिनी जिओ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, 14 जून 2022 नंतर आलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यात पूर आला आहे. त्यामुळे आतापर्यंत जवळपास 1033 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 207 महिला आणि 348 बालकांचा समावेश आहे. तर, 1500 हून अधिकजण जखमी झाले आहेत. मागील 24 तासात 119 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर, 71 जण जखमी झाली आहेत. मागील 24 तासाच्या आकडेवारीत सिंध प्रांतात सर्वाधिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सिंध प्रांतात 76 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, पख्तूनख्वामध्ये 31, बलुचिस्तानमध्ये 4 आणि गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये सहाजणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. तर, 5 लाख जनावरांचाही मृत्यू झाला आहे.
पुरामुळे आर्थिक फटका
पाकिस्तानमधील पुरामुळे जीवितहानी आणि आर्थिक हानीदेखील मोठ्या प्रमाणावर झाली आहे. पाकिस्तानमध्ये आलेल्या या पुरामुळे जवळपास 4 अब्ज डॉलरपेक्षाही अधिक नुकसान झाले असल्याचे 'द एक्स्प्रेस ट्रिब्युन'ने आपल्या वृत्तात म्हटले आहे. पुरामुळे शेतीलाही फटका बसला असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पाकिस्तानला कापसाच्या आयातीसाठी 2.6 अब्ज डॉलर आणि गव्हासाठी 90 कोटी डॉलर खर्च करावे लागू शकतात. पुरामुळे पाकिस्तानच्या वस्त्रोद्योगाला मोठा फटका बसला आहे. जवळपास एक अब्ज डॉलरची कापडाची निर्यात गमवावी लागू शकते. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या पाकिस्तानची परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.
लाखो लोक बेघर
जिओ न्यूजने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये 9 लाख 49 हजार 858 घरांचे अंशत: अथवा पूर्ण नुकसान झाले आहे. जवळपास 200 हून अधिक दुकानेही उद्धवस्त झाली आहेत. पाकिस्तानमध्ये आलेल्या पुरातून 51,275 जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. तर, 4 लाख 98 हजार 442 जणांना मदत शिबिरात स्थलांतरीत करण्यात आले आहे. तर, 3451 किमीचा रस्ता आणि 149 पूल उद्धवस्त झाले आहेत. त्याशिवाय सहा धरणेही फुटली असल्याची माहिती आहे.
किती जिल्ह्यांना फटका
पाकिस्तानमधील 110 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. त्यातील 72 जिल्ह्यांना संकटग्रस्त जिल्हे जाहीर करण्यात आले आहे. पाकिस्तानमध्ये सर्वात गंभीर परिस्थिती सिंध, पंजाब, खैबर पख्तूनख्वा, बलुचिस्तान या प्रांतात आहे. सिंध प्रांतातील 23 जिल्ह्यांमध्ये पूर आला आहे. यामुळे जवळपास 1 कोटी 45 लाख लोखांना फटका बसला आहे. बलुचिस्तान प्रांतातील 34 जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे 43 लाख लोकांना फटका बसला आहे.
पावसाने विक्रम मोडले
पाकिस्तानमध्ये मागील 30 वर्षात सरासरी 134 मिमी पाऊस झाला आहे. मात्र, 2022 मध्ये 384.7 मिमीहून अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. पाकिस्तानमध्ये होणाऱ्या पावसाच्या सरासरीपेक्षा 190.07 टक्के अधिक पाऊस आहे. बलुचिस्तान आणि सिंध प्रांतांत गंभीर परिस्थिती आहे. बलुचिस्तानमध्ये झालेला पाऊस हा मागील 30 वर्षातील पावसाच्या पाचपट अधिक आहे.