Pakistan Election : पाकिस्तान निवडणुकीच्या निकालाचे चित्र हळूहळू स्पष्ट व्हायला सुरूवात झाली आहे, या निकालाची अद्यापही मतमोजणी सुरूच आहे. मतमोजणीसाठी देखील बराच विलंब होताना दिसत आहे. अशात, माजी पंतप्रधान तसेच 'पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ'चे (PTI) इम्रान खान (Imran Khan) यांनी विजयाचा दावा केला आहे. इम्रान खान यांनी आपल्या एका भाषणाचा व्हिडीओ जारी केला आहे. हा व्हिडीओ AI आधारित आवाजासह रेकॉर्ड करण्याच आल्याचे समजते. इम्रान खानचा हा व्हिडिओ अशा वेळी समोर आला आहे, जेव्हा त्यांच्या पक्षाला पाठिंबा देणारे अपक्ष उमेदवार पाकिस्तान निवडणुकीत जागांच्या संख्येच्या बाबतीत आघाडीवर आहेत. 


कोणाचा पक्ष कुठल्या क्रमांकावर?


निकालाची अद्यापही मतमोजणी सुरूच असून आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार इम्रान खान यांच्या पक्षाला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष उमेदवारांनी 97 जागा जिंकल्या आहेत, तर नवाझ शरीफ यांच्या पक्षाला 72 जागा मिळाल्या आहेत, बिलावल भुट्टो यांचा पीपीपी 52 जागांसह तिसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानमध्ये 265 जागांवर निवडणूक झाली होती, त्यापैकी 252 जागांसाठी निकाल आले आहेत. बहुमतासाठी 133 जागांची गरज आहे. इम्रान खान यांनी जारी केलेल्या व्हिडीओत म्हटंलय की,  'पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ' (PMLN) चे प्रमुख नवाझ शरीफ (Nawaz Shariff) यांची 'लंडन योजना' अयशस्वी ठरली आहे.


 


व्हिडीओमध्ये काय म्हणाले इम्रान?


पीटीआयचे संस्थापक इम्रान खान यांनी जारी केलेल्या व्हिडीओमध्ये ते म्हणाले, 'माझ्या प्रिय देशवासियांनो. आपल्या लोकशाही अधिकारांचा वापर करत मतदान केंद्रावर मोठ्या संख्येने नागरिक पोहचले, इथल्या नागरिकांना त्यांचे हक्क बजावण्याचे स्वातंत्र्य मिळावे. या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही माझ्यासाठी मतदान करण्यासाठी आलात यावर मला पूर्ण विश्वास आहे. ते पुढे म्हणाले, 'निवडणुकीच्या दिवशी झालेल्या प्रचंड मतदानाने लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तुम्ही माझ्या विश्वासावर कायम राहिलात. लोकशाही प्रक्रियेत तुमच्या सक्रिय सहभागामुळे 'लंडन योजना' अयशस्वी झाली आहे. नवाझ शरीफ हे कमी बुद्धिमत्तेचे नेते आहेत, ज्यांनी 30 जागांवर आपला पक्ष पिछाडीवर असूनही विजयी भाषणे देण्यास सुरुवात केली.


 


निवडणुकीतील हेराफेरीबाबत खान म्हणाले...


इम्रान खान यांनी असा दावा केला की, माजी पंतप्रधानांनी पुन्हा एकदा निवडणुकीत हेराफेरी केली आहे. ते म्हणाले, 'पाकिस्तानच्या निवडणुकीत होणारी हेराफेरी कोणीही मान्य करणार नाही. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्येही याविषयी विस्तृत वार्तांकन करण्यात आले आहे. फॉर्म 45 डेटानुसार, आम्ही 170 पेक्षा जास्त सार्वत्रिक निवडणुकीच्या जागा जिंकण्याच्या मार्गावर आहोत. 'पाकिस्तानमध्ये लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी एक तारीख निश्चित करण्यात आली आहे. 2024 च्या निवडणुका आम्ही दोन तृतीयांश बहुमताने जिंकत आहोत. तुमच्या मताची ताकद सर्वांनी पाहिली आहे. आता ते जतन करण्याची तुमची क्षमता दाखवा.