इस्लामाबाद : भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांची दया याचिका पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फेटाळली आहे. आता सर्वांचं लक्ष पाकचे लष्कर प्रमुख जावेद बाजवा यांच्याकडे लागलं आहे, जे कुलभूषण यांच्याविरोधातील कथित पुराव्यांची तपासणी करुन त्यांच्या याचिकेवर निर्णय घेतील.


कुलभूषण जाधव यांच्या सर्व दया याचिकांवर सुनावणी पूर्ण होणार नाही, तोपर्यंत त्यांना फाशी दिली जाणार नाही, असं पाकिस्तानने 1 जूनला स्पष्ट केलं होतं. कुलभूषण जाधव पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आणि पाकिस्तानच्या राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल करु शकतात.

कुलभूषण जाधव यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जावेद बाजवा यांच्याकडे अगोदरच दया याचिका दाखल केली आहे. आता यानंतर पाकिस्तानच्या राष्ट्रपतींकडे दया याचिक दाखल करण्याचा पर्याय कुलभूषण जाधव यांच्याकडे आहे.

कुलभूषण जाधव यांना अजून कायदेशीर मदत नाही

पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना अजूनही कायदेशीर मदत दिलेली नाही. भारताने कौन्सिलर अॅक्सेस देण्यासाठी पाकिस्तानला 18 वेळा विनंती केली आहे. मात्र पाकिस्तानने भारताची विनंती मान्य केली नाही. भारताने हा मुद्दा आंतरराष्ट्रीय कोर्टातही उठवला होता. कोर्टानेही भारताला कौन्सिलर अॅक्सेस द्यावा, असं म्हटलं होतं.

कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती

सुनावणीदरम्यान भारताने पाकिस्तानवर व्हिएन्ना करारचं उल्लंघन केल्याचा आरोप करत, कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती दिली.

कोण आहेत कुलभूषण जाधव?

कुलभूषण जाधव यांच्यावर ‘रॉ’चे हेर असल्याचा आरोप लावत बलुचिस्तान प्रांतात त्यांना गेल्या वर्षी 3 मार्च 2016 मध्ये अटक झाली होती. जाधव कुटुंबीय मूळचं सांगलीचं असून सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. कुलभूषण यांचे वडील मुंबई पोलिस दलाचे माजी कर्मचारी आहेत.

जाधव यांनी नौदलातून निवृत्ती स्वीकारुन व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यामुळे आपला मुलगा हेर असल्याचा आरोप जाधव कुटुंबीयाने फेटाळून लावला आहे. ‘माझ्या मुलाला यात अडकवण्यात आलं आहे. कुलभूषण इराणच्या चबाहारमध्ये सल्लागार म्हणून व्यवसाय करतो,’ अशी माहिती त्यांच्या वडिलांनी दिली होती.

संबंधित बातम्या :


कुलभूषण यांना अजून फाशी का नाही, पाकिस्तानमध्ये याचिका


कुलभूषण जाधव प्रकरणी काही तासातच फैसला


पाकचा सर्वात मोठा पुरावा आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फेटाळला!


आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती


भारताची पहिली चाल यशस्वी: अॅड. उज्ज्वल निकम


कुलभूषण जाधवांच्या कथित कबुलनाम्याच्या व्हिडीओत 102 कट्स


कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणण्यासाठी जोरदार हालचाली


कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी कोर्टाकडून फाशीची शिक्षा