Greece Ship Capsized : युरोपातील ग्रीस (Greece) या देशातील समुद्रात बुधवारी (14 जून) रोजी प्रवासी जहाज बुडाल्याने 79 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. परंतु या दुर्घटनेमध्ये जवळपास 100 लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. या दुर्घटनेला मागील काही काळामधील सर्वात मोठी दुर्दैवी घटना असल्याचं म्हटलं जात आहे. या दुर्घटनेमध्ये अनेक जण बेपत्ता असल्याचा देखील अंदाज वर्तवण्यात येत आहे.
हे जहाज बुडाल्यानंतर तात्काळ बचाव कार्य सुरु करण्यात आलं आहे. एका युरोपीय बचाव पथकाच्या माहितीनुसार, या जहाजामध्ये जवळपास 750 प्रवासी प्रवास करत होते. परंतु या जहाजामध्ये एकूण किती प्रवासी होते याबाबत अजूनही खात्रीपूर्वक माहिती समोर आली नाही. त्यामुळे प्रशासनाकडून देखील या संदर्भात फक्त अंदाज वर्तवण्यात येत आहेत. तसेच स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत जवळपास 104 लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. हे जहाज लिबियामधून रवाना झाल्याचं म्हटलं जात आहे.
लष्कर आणि नौदलाचे जवान घटनास्थळी
स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या जहाजामधील अनेक प्रवासी हे इजिप्त, सीरिया आणि पाकिस्तानातले होते. हे प्रवासी जहाज दक्षिण ग्रीसमधील कोस्टल टाऊन पाइलोसपासून जवळपास 80 किमी अंतरावर बुडाले. जहाज बुडाल्यानंतर तटरक्षक दल, तसेच नौदलाचे एक जहाज, लष्कराचे एक विमान यांच्या साहाय्याने मदत केली जात आहे. बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी काळोखामुळे बचाव कार्य थांबबावे लागले. परंतु गुरुवारी सकाळपासून पुन्हा बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. तसेच या बचावकार्यामध्ये आतापर्यंत अनेक लोकांना वाचवण्यात यश आल्याचं प्रशासानाकडून सांगण्यात येत आहे.
या दुर्घटनेमध्ये सुखरुप वाचवलेल्या लोकांना पाइलोस जवळील कलामाता या ग्रीक बंदरावर नेण्यात येत आहे. येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. तसेच या घटनेमध्ये मृत झालेल्यांची ओळख देखील पटवण्यात येत असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेमुळे ग्रीसमध्ये तीन दिवसांसाठी राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तसेच या घटनेला इतिहासातील सर्वात दुर्दैवी घटना असल्याचं म्हटलं जात आहे. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अशाच प्रकारच्या दुर्घटनेमध्ये 96 लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. परंतु हे जहाज कशामुळे बुडाले याचे कारण अद्याप समजू शकले नाही आहे. त्यामुळे प्रशासनाच्या हालचालींकडे आता देशाचे लक्ष लागून राहिले आहे.