Omicro Variant : कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनची धास्ती संपूर्ण जगाने घेतली आहे. ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात असताना दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेने मोठा इशारा दिला आहे. युरोपमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होणार असल्याचे इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे स्थानिक संचालक डॉ. हँस क्लूज यांनी व्हिएन्नामधील पत्रकार परिषदेत दिला.
क्लूज यांनी सांगितले की, येत्या काही आठवड्यात युरोप आणि अन्य काही देशांमध्ये ओमायक्रॉनबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या लाटेमुळे आधीच ताण असलेल्या आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य असलेल्या 38 युरोपीयन देशांमध्ये ओमायक्रॉन आढळला असल्याचे त्यांनी सांगितले. ब्रिटन, डेन्मार्क आणि पोर्तुगालमध्ये याआधीच ओमायक्रॉनचा जोर वाढला आहे.
त्यांनी पुढे म्हटले की, मागील आठवड्यात युरोपीयन युनियनच्या सदस्य देशांमध्ये 27 हजार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर, 26 लाख बाधित आढळले आहेत. यामध्ये कोरोनाच्या सर्व व्हेरियंट बाधितांचा समावेश आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही संख्या 40 टक्के अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. क्लूज यांनी सांगितले की, कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे अधिकाधिक बाधितांना रुग्णालयात दाखल व्हावे लागू शकते.
नाताळ आणि नवीन वर्षाचे मोठे सेलिब्रेशन रद्द करण्याची मागणी
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडनॉम यांनी म्हटले की, नाताळ आणि नवीन वर्षाचे कार्यक्रम रद्द करणे हे जीव धोक्यात घालण्यापेक्षा केव्हाही चांगले आहे. काही कठीण निर्णय घ्यावे लागणार असून त्याअनुषंगाने मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन रद्द करावे किंवा तारीख पुढे ढकलावी. ओमायक्रॉन हा डेल्टाच्या तुलनेत अधिक वेगाने फैलावत असून त्याचे पुरावे असल्याचे त्यांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या: