प्याँगयांग (उत्तर कोरिया) : उत्तर कोरियानं नुकतीच हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेऊन आपली मुजोरी कायम ठेवली. भारतासह इतर देशांनी उत्तर कोरियाला अशा प्रकारच्या कारवाया रोखण्याचं आवाहन केलं आहे. मात्र, उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनचा पवित्रा पाहिल्यानंतर ते काही ऐकणाऱ्यातले नाहीत असंच दिसतं आहे. हा किम जोंग उन कोण आहे आणि त्याच्या आतापर्यंतचा एकूण कारभार कसा आहे यावरचा एक विशेष रिपोर्ट.
किम जोंग शिक्षा देताना त्यात क्रूरपणा ठासून भरला असेल, याची पूर्ण खबरदारी घेतो. 2013 साली किमनं आपल्या सख्ख्या आत्याच्या नवऱ्याला चक्क 120 शिकारी कुत्र्यांसमोर टाकून त्यांचा खून केला होता.
आपल्या पतीच्या क्रूर हत्येनं खवळलेल्या आत्याने किमविरोधात आरोपांच्या फैरी झाडल्या. अशी क्रूर हत्या करणाऱ्या किमला हुकूमशाहची उपमा दिली आणि याच टीकेनं खवळलेल्या किमनं आपल्या आत्यालाच विष घालून ठार मारलं.
किमला त्याचा अपमान अजिबात सहन होत नाही. त्यामुळे एकदा एका बैठकीत देशाच्या संरक्षण मंत्र्यानं किमच्या समोर डुलकी घेतली आणि तिथेच किमचं डोकं सटकलं. किमनं त्याच्या अटकेचे आदेश काढले आणि त्याला थेट तोफेच्या तोंडी दिलं. इतकंच नाही तर या देहदंडाच्या शिक्षेवेळी सर्व अधिकाऱ्यांना हजर राहण्याचं फर्मान काढलं.
किमच्या क्रूरतेचा त्याच्या जवळच्या लोकांनाही फटका बसला. ज्यांनी ज्यांनी किमच्या धोरणांना विरोध केला त्यांना किमनं यमसदनी धाडलं. किमच्या क्रूरतेपायी 200 नेते आणि अधिकाऱ्यांनी जीव गमावला आहे. इतकंच नाही तर किमच्या आदेशावरून आतापर्यंत तब्बल 2 लाख लोकांना तुरुंगात डांबण्यात आलं आहे.
इथं चुकीला माफी नाही... हा फिल्मी डायलॉग किमसाठी तंतोतंत लागू होतो. कारण कोरियात जर एखाद्याला शिक्षा झाली. तर ती त्याला भोगावीच लागते. आपल्याकडे जसा दयेचा अर्ज असतो तशी तिथे कोणतीही पद्धत नाही.
चार वर्षांपूर्वी किम जोंगचे वडील जोंग इल यांचं निधन झालं. तेव्हाही किमने अनेकांना फासावर लटकवलं. आपल्या वडिलांच्या अंत्ययात्रेमध्ये प्रत्येकाने रडायलाच हवं. असं फर्मान किमनं काढलं होतं. त्याच्या या धमकीला घाबरून अनेक जणांनी अश्रू ढाळलेही. पण ज्यांना रडू कोसळलं नाही त्यांना किमनं थेट सुळावर चढवलं.
किमनं आपल्या गर्लफ्रेंडचाही गोळ्या घालून खून केला आहे. किमची गर्लफ्रेन्ड ही गायिका होती. पण त्यांचा म्युझिकल ग्रुप हा पॉर्न फिल्म बनवत असल्याची खबर किमला मिळाली. याच कारणावरून किमने तिला अटक केली आणि गोळ्या घालून तिची हत्या केली.
कोरियाची श्रीमंत प्रतिमा जपण्याचा किम आटोकाट प्रयत्न करतो. म्हणूनच कोरियातल्या गरिबांचे फोटो काढून प्रसिद्ध करण्याला किमने बंदी घातली आहे आणि असा प्रमाद एखाद्याने केला तर त्याला भर चौकात गोळ्या घातल्या जातात.
बायबल बाळगणे, पॉर्न पाहाणे, दक्षिण कोरियाच्या फिल्म पाहणे, टूरिस्टना मोबाईल, कॅमेरा, लॅपटॉप बाळगणे यावर किमने पूर्ण बंदी घातली आहे. इतकंच नाही तर जीन्स घालण्यावरही किमने बंधने घातली आहेत.
हे नियम जर पाळले नाही तर थेट तुरुंगात डांबलं जातं. किमच्या सरकारने अनेक परिवारांच्या तीन-तीन पिढ्यांना तुरुंगात सडवलं आहे.
पॉर्न पाहण्यावर बंदी घालणाऱ्या किमला शाळेत असताना पॉर्न मॅगझीन पाहताना पकडलं होतं. किम हा नाव बदलून स्वित्झर्लंडच्या बर्नमधल्या शाळेत शिकायचा. अत्यंत ढ विद्यार्थी अशी किमची ओळख होती. गणित आणि विज्ञानसारख्या विषयांमध्ये तो नेहमी माती खायचा. इतकंच नाही तर अनेक वेळा तो नापासही झाला होता.
आपल्या आजोबांप्रमाणेच दिसण्यासाठी किमने 2000 साली प्लॅस्टिक सर्जरी केल्याची माहिती आहे. किमचे आजोबाही हुकूमशाह होते आणि त्यांची दहशत कायम ठेवण्यासाठी किमने सर्जरी केल्याचं कळतं आहे.
किमची हेअरस्टाईल हा जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. कारण किमने आपल्यासारखीच हेअरस्टाईल प्रत्येकाने करावी असं फर्मानही सोडलं होतं.
उत्तर कोरियात इतर कोणत्याही देशातल्या प्रसारमाध्यमांना बातमीदारी करण्याची मनाई आहे. तसं करताना कुणी दिसलं तर त्याला आजन्म तुरुंगात डांबलं जातं.
इतकंच नाही तर कोरियामध्ये सर्वसामान्यांना इंटरनेट वापरावरही पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
आपण महापुरुष किंवा देवाचे अवतार असल्याचा भास किम जोंगने निर्माण केला आहे. आपण इंद्रधनुष्यातल्या दोन रंगांच्या मध्ये जन्मलाचा दावा तो करतो. इतकंच नाही तर आपल्या जन्मावेळी एक ताराही जन्मल्याच्या कथा त्याने पसरवल्या आहेत. वातावरणात होणाऱ्या बदलांवर आपले पूर्ण नियंत्रण असल्याच्या बाताही त्याने मारल्या आहेत. या महाभागाच्या एक नव्हे तर तीन जन्मतारखा आहेत.
मूर्खपणाची हद्द म्हणजे किमला आवडणाऱ्या करड्या रंगाच्या रंगात कोरियातली घरे रंगवण्याचं फर्मान किमने काढलं आहे आणि हा नियम न पाळणाऱ्यांना आजन्म तुरुंगवासाची शिक्षा. कायम तरुण राहण्यासाठी किम जॉन्ग कायम खात राहतो. 4 वर्षात त्याचं वजन 40 किलोने वाढल्याच्याही कहाण्या आहेत.
किमच्या रंगेलपणाचेही अनेक किस्से आहेत. त्याची वासना मिटवण्यासाठी मुलींचा चक्क स्क्वॉड तयार केला जातो. त्यासाठीच्या मुली या थेट शाळेतून उचलल्या जातात. त्यानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी केली जाते आणि त्यातल्या कुमारिकांनाच यात स्थान दिले जाते. या बदल्यात त्यांना पैसे आणि गिफ्ट दिले जातात. कधीकधी या स्क्वाडला सेक्स पार्टीमध्येही सहभागी केलं जातं. उंच आणि सुंदर मुलींनाच यात भरती करण्याचा किमचा आग्रह असतो
किम दरवर्षी फक्त दारु ढोसण्यासाठी तब्बल 180 कोटी रुपयांचा खर्च करतो. जगातले सर्वात महागडे ब्रॅन्ड त्याच्या बार काऊंटरमध्ये आहेत.
किमच्या ताफ्यामध्ये एक लग्जरी विमानही आहे. ज्यामध्ये सोन्याचं नक्षीकाम करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर त्याच्या घराजवळ स्वतःचा रनवे आहे.
किमला खाण्यामध्ये डेन्मार्कच्या डुकराचे मांस, इराणचे मासे, जपानमधलं बीफ आणि चीनचं कलिंगड आवडतं. हे सगळे जिन्नस रोजच्या रोज त्याच्यासाठी ज्या त्या देशातून येतात. इतरांच्या समाजमाध्यमांवर बंदी घालणाऱ्या किमनं स्वतःसाठी मात्र घरच्या घरी सिनेमा थिएटर उभं केलं आहे.
उत्तर कोरियाच्या किम जोंगचे 20 क्रूर कारनामे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Sep 2017 09:57 PM (IST)
उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उननं आपल्या क्रूर कारभारनं संपूर्ण उत्तर कोरियात दहशतीचं वातावरण निर्माण केलं आहे. त्यामुळे आज कुणीही उत्तर कोरियात त्याच्याविरुद्ध एक शब्दही उच्चारत नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -