इस्लामाबाद : पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी नवाज शरीफ यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. “पाकिस्तानला लष्कराकडून नव्हे, पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याकडून धोका आहे”, अशी टीका इम्रान खान यांनी नवाज शरीफ यांच्यावर केली.

 

बाग आणि मुजफ्फराबादमधील सभेला संबोधित करताना इम्रान खान यांनी शरीफ यांच्यावर निशाणा साधला.

 

“1999 साली सत्तापालटानंतर जनरल परवेझ मुशर्रफ यांनी शरीफ यांचं सरकार बरखास्त करुन अटक केली. त्यावेळी पाकिस्तानचे नागरिक रस्त्यावर उतरले नाहीत, जशाप्रकारे गेल्या शुक्रवारी तुर्कीमधील नागरिक उतरले होते. त्याउलट पाकिस्तानी नागरिकांनी नवाज शरीफ यांच्या बरखास्तीची घटना साजरी केली आणि मिठाई वाटली.”, असे इम्रान खान मुजफ्फराबादमध्ये म्हणाले.