Nikki Haley vs Joe Biden, US President Election: आगामी काळात देशात निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. जगातील महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेतही (America) आतापासूनच निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अमेरिकेत पुढच्या वर्षी होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांबाबत (US President Election) राजकीय वर्तुळात (World Political Updates) चर्चा रंगली आहे. महत्त्वाचं म्हणजे, यंदा अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीत भारतीय वंशाचे अनेक चेहरे सहभागी झाले आहेत. ज्यामध्ये सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती, निक्की हेली यांची. भारतीय वंशाच्या निक्की हेली (Nikki Haley) या रिपब्लिकन पक्षाकडून प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत.


आगामी राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीबाबत नुकतंच वॉल स्ट्रीट जर्नलनं (The Wall Street Journal) एक सर्वेक्षण केलं आहे. सर्वेक्षणातून असं समोर आलं आहे की, आज जर राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक झाली तर निक्की हेली या डेमोक्रॅट पक्षाचे नेते आणि सध्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांचा मोठ्या मताधिक्यानं पराभव करू शकतात. निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या निक्की हेली यांनी लोकप्रियतेच्या बाबतीत जो बायडन यांना मागे टाकल्याचं वॉल स्ट्रीट जर्नलच्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. 



वॉल स्ट्रीट जर्नलच्या सर्वेक्षणानुसार, दक्षिण कॅरोलिनाच्या माजी गव्हर्नर निक्की हेली या जो बायडन यांच्यापेक्षा 17 गुणांनी पुढे आहेत. सर्वेक्षणात बायडन यांना 34 टक्के तर हेली यांना 51 टक्के लोकांचा पाठिंबा मिळाला आहे.


सर्वेक्षणात समाविष्ट असलेल्या 36 टक्के मतदारांचं म्हणणं आहे की, जर आज निवडणुका झाल्या, तर जो बायडन यांना निक्की हेली कडवी झुंज देतील आणि आमचा पूर्ण पाठिंबा हेली यांनाच असेल. दुसरीकडे, या सर्वेक्षणात समाविष्ट असलेल्या 15 टक्के मतदारांनी अद्याप कोणाला मतदान करायचं, हे ठरवलेलंच नाही.


हेली आणि बायडन यांच्यात हाच फरक राहिला आणि हेली रिपब्लिकन प्रायमरीची निवडणूक जिंकल्या तर त्या एक प्रकारे इतिहास घडवू शकतात, असं बोललं जात आहे. यापूर्वी 1984 मध्ये रोनाल्ड रेगन यांनी वॉल्टर मोंडेल यांचा पराभव केला होता, तेव्हा अशीच परिस्थिती पाहायला मिळाली होती. रेगन यांनी वॉल्टरचा 18 गुणांच्या आघाडीनं पराभव केला होता.



हेली यांना मागे टाक ट्रम्प आघाडीवर 


वॉल स्ट्रीट जर्नलच्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे की, निक्की हेली जरी राष्ट्राध्यक्ष बायडन यांना मागे टाकत आघाडीवर असल्या तरीदेखील त्या माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना मात्र मागे टाकू शकलेल्या नाहीत. डोनाल्ड ट्रम्प निक्की हेली यांना मागे टाकत आघाडीवर आहेत. सर्वेक्षणात ट्रम्प हेली यांच्यापेक्षा तब्बल 40 गुणांनी पुढे आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना जवळपास 60 टक्के मतदारांनी पाठिंबा दर्शवला आहे. सर्वेक्षणातून एक धक्कादायक कलही समोर आला आहे, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दाखल असलेल्या कोणत्याही फौजदारी खटल्यात दोषी आढळले तरीदेखील ते बायडन यांच्यापेक्षा केवळ एक अंक मागे असतील.