वेलिंग्टन : न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅकिंडा आर्डर्न यांनी नुकतंच गोंडस बाळाला जन्म दिला. पदावर असताना प्रसुत होणाऱ्या त्या न्यूझीलंडच्या पहिल्याच पंतप्रधान ठरल्या आहेत.


ऑकलंडमध्ये असलेल्या देशातील सर्वात मोठ्या खाजगी रुग्णालयात आर्डर्न यांनी मुलीला जन्म दिला. यावेळी त्यांचे पती आणि टेलिव्हिजन प्रेझेंटर क्लार्क गेफोर्डही सोबत होते.

गेल्या वर्षी पदाची सूत्रं हाती घेताना 37 वर्षीय आर्डर्न या पंतप्रधानपदी विराजमान होणाऱ्या देशाच्या सर्वात तरुण व्यक्ती ठरल्या होत्या. पंतप्रधानपद काबीज करण्याच्या अवघ्या सहाच दिवस आधी त्यांना आपण गरोदर असल्याचं समजलं होतं. आता, पदावर असताना प्रसुत होणाऱ्याही त्या पहिल्याच पंतप्रधान ठरल्या आहेत.



आर्डर्न मातृत्व रजेवर असेपर्यंत उपपंतप्रधान विन्स्टन पीटर्स पुढील सहा महिन्यांसाठी देशाचा कारभार सांभाळतील.

न्यूझीलंडमध्ये 1893 साली महिलांना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. आर्डर्न या देशाच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान ठरल्या आहेत.

ऑगस्टच्या सुरुवातीला आपण कार्यालयात परत येऊ. त्यानंतर पती बाळाची काळजी घेतील. देशाबाहेर कामानिमित्त जावं लागलं, तरी पती बाळाचा सांभाळ करतील, असं आर्डर्न यांनी सांगितलं.

यापूर्वी 1990 मध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांनी पदावर असताना बाळाला जन्म दिला होता.