न्यूयॉर्क : पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांची मुलगी डीना वाडिया यांचं निधन झालं आहे. न्यूयॉर्कमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 98 वर्षांच्या होत्या.


डीना वाडिया ह्या, मोहम्मद जिना आणि रतनबाई पेटिट यांच्या एकमेव अपत्य होत्या. त्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1919 रोजी झाला होता. वाडिया ग्रुपचे संचालक नुस्ली वाडिया यांच्या डीना वाडिया आई होत्या.

डीना वाडिया यांच्या कुटुंबात मुलगा नुस्ली वाडिया, डायना वाडिया आणि नातू नेस आणि जहांगीर वाडिया यांचा समावेश आहे.

डीना वाडिया यांनी फाळणीनंतर भारतातच राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र काही काळाने त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या.

गुजरातची खास नातं

डीना यांचे आजी-आजोबा गुजरातमधील होते. 1870 च्या सुमारास ते व्यवसायासाठी कराचीला गेले होते. तिथेच डीना यांचे वडील मोहम्मद अली जीना यांचा जन्म झाला होता.

डीना 2004 मध्ये पाकिस्तानात गेल्या होत्या. पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या खास निमंत्रणानंतर त्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना पाहायला गेल्या होत्या. 1948 नंतर वडील जिनांच्या निधनानंतर त्या कधीही केलेल्या नव्हत्या.

डीना आणि जिना यांचा प्रसिद्ध किस्सा



डीना आणि जिना यांच्यातील एक किस्सा अतिशय प्रसिद्ध आहे. ही गोष्ट डीना वाडिया यांच्या लग्नाशी संबंधित आहे. डीना यांना मुंबईच्या (तेव्हाचं बॉम्बे) प्रसिद्ध पारशी कुटुंबातील मुलगा नेविल नेस वाडिया यांच्याशी लग्न करायचं होतं.

या लग्नासाठी डीना यांनी वडील मोहम्मद अली जिना यांच्याशी बातचीत केली. परंतु हे ऐकून जिनांना संताप आला. भारतात लाखो मुस्लीम मुलं आहेत. त्यापैकीच एकाची निवड करुन लग्न कर, असा सल्ला त्यांनी दिला.

वडिलांच्या या सल्ल्यावर उलट उत्तर देत डीना म्हणाल्या की, “भारतात लाखो मुस्लीम मुली असतानाही तुम्ही त्यापैकी एका मुलीशी लग्न का केलं नाही?”

मोहम्मद अली जीना स्वत: मुस्लीम असूनही त्यांनी पारशी मुलगी रतनबाई उर्फ रुटी यांच्यासोबत लग्न केलं होतं.

जेव्हा जिना भारतात मुस्लीमांचे नेते बनण्याच्या प्रयत्नात होते, तेव्हा डीना वाडिया यांनी नेव्हिल वाडिया यांच्याशी लग्न केलं.