वॉशिंग्टन: नोकरीच्या शेवटच्या दिवशी वैतागलेले कर्मचारी काय-काय करु शकतात याचं मोठं उदाहरण समोर आलं आहे. मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट ट्विटरला अशाच एका कर्मचाऱ्याने झटका दिला.


ट्विटरमधील नोकरीच्या शेवटच्या दिवशी एका बहाद्दराने, थेट जगातील सर्वात शक्तीशाली नेता अर्थात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचंच ट्विटर अकाऊंट बंद करुन टाकलं.

डोनाल्ड ट्रम्प यांचं @realDonaldTrump हे ट्विटर हॅण्डल आहे.  मात्र या हॅण्डलवर गेल्यानंतर “माफ करा, हे पेज उपलब्ध नाही” असा मेसेज दिसत होता.

मात्र ट्विटरने या मेसेजची तातडीने दखल घेत चौकशी केली. त्यावेळी हे ट्विटर हॅण्डल ट्विटरमधील कर्मचाऱ्याच्या चुकीने बंद झाल्याचं निदर्शनास आलं. त्याबाबत ट्विटरने अधिकृत पत्रक जारी करुन, हे ट्विटर हॅण्डल जाणीवपूर्वक बंद करण्यात आलं असावं, असं दिसत असल्याचं नमूद केलं.

ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट ज्या कर्मचाऱ्याने डीअक्टिवेट किंवा बंद केलं, त्या कर्मचाऱ्याचा गुरुवारी कंपनीतील शेवटचा दिवस होता.

ट्रम्प यांचं @realDonaldTrump हे ट्विटर हॅण्डल जवळपास 11 मिनिटं बंद होतं.

यानंतर ट्विटरने जारी केलेल्या पत्रकात, “हे अकाऊंट 11 मिनिटं बंद होतं ते पुन्हा सक्रिय करण्यात आलं. याबाबत आम्ही चौकशी करत आहोत, तसंच यापुढे अशी घटना घडू नये यासाठीही प्रयत्न करत आहोत”, असं म्हटलं आहे.

त्यानंतरही ट्विटरकडून @Twittergov  या अकाऊंटवरुन दुसरं पत्रक जारी करण्यात आलं. यामध्ये ट्रम्प यांचं ट्विटर हॅण्डल ट्विटरमधील कर्मचाऱ्याने बंद केल्याचं म्हटलं आहे. चौकशीदरम्यान ‘ट्विटर कस्टमर सपोर्ट’ विभागातील कर्मचाऱ्याने हे कृत्य केलं. ज्याने बंद केलं त्याचा शेवटचा दिवस होता, असं या पत्रकात म्हटलं आहे.