Nepal PM Wife Passed Away: नेपाळचे पंतप्रधान (Nepal PM) पुष्प कमल दहल प्रचंड (Pushpa Kamal Dahal Prachand) यांच्या पत्नीचं बुधवारी (12 जुलै) निधन झालं. मिळालेल्या माहितीनुसार, दीर्घकाळ आजारानं त्रस्त असलेल्या नेपाळच्या पंतप्रधानांच्या पत्नी सीता दहल यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान प्रचंड यांच्या पत्नीवर नेपाळच्या नॉर्विक इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.


रुग्णालय प्रशासनानं जारी केलेल्या निवेदनानुसार, सीता दहल यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासह इतरही काही आजार होते, त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. 12 जुलै रोजी सकाळी 8.33 वाजता सीता दहल यांनी अखेरचा श्वास घेतला.






दीर्घ आजारानं निधन 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या पत्नी सीता दहल या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. विविध आजारांनी त्रस्त असलेल्या सीता दहल यांना सुमारे दोन वर्षांपूर्वी मुंबईत उपचारासाठी आणण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नव्हती. मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळच्या पंतप्रधानांच्या पत्नीला पार्किन्सन्ससारखी लक्षणं असलेल्या मेंदूच्या आजारानं ग्रासलं होतं.


हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू 


नेपाळच्या पंतप्रधानांच्या पत्नी सीता दहल यांनी वयाच्या 69 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी सकाळी आठ वाजता त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. डॉक्टरांनी त्यांना 8.33 वाजता मृत घोषित केलं. सीता दहल यांना प्रोग्रेसिव्ह सुप्रान्युक्लियर पाल्सी या आजारानं ग्रासलं होतं. याशिवाय त्यांना पार्किन्सन्स, डायबिटीज टाईप-2 आणि उच्च रक्तदाब यासारखे आजारही होते. 


सीता दहल दुर्मिळ आजारानं होत्या ग्रस्त 


PSP हा मेंदूचा एक दुर्लभ आजार आहे. ज्यामुळे हालचाल, संतुलन आणि डोळ्यांच्या हालचालींमध्ये समस्या निर्माण होतात. त्याचा मेंदूतील पेशींवर परिणाम होतो. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हा एक अत्यंत दुर्मिळ आजार आहे, जो एक लाख लोकांमध्ये केवल 5 ते 6 जणांना होऊ शकतो. 


प्रकृती अस्वास्थ्यामुळे ISUI मध्ये होत्या दाखल 


माहितीनुसार, सीता दहल यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आलं होतं. पुढील उपचारासाठी त्यांना भारतातील तसेच नेपाळमधील विविध रुग्णालयांमध्ये नेण्यात आलं, मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही.