मुंबई : अमेरिकेची अंतराळ संशोधन यंत्रणा नासाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. मंगळवारी पहाटे नासाच्या ओसायरस रेक्स यानाच्या रोबोटिक हाताने बेन्नू लघुग्रहाच्या जमिनीला स्पर्श केला, तिथले काही माती, खड्यांचे नमुने जमा केले आणि यान या लघुग्रहापासून सुरक्षित अंतराकडे झेपावले. यावर अनेक दशकांच्या नियोजनाने आणि टीमच्या अविरत कष्टाने आम्ही हे मिशन यशस्वी करु शकलो अशी प्रतिक्रिया नासाने दिली आहे. नासाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे बेन्नू लघुग्रहावरून माती, खड्यांचे नमुने यशस्वीपणे जमा करण्यात आले आहेत.


नासाचं ओसायरस रेक्स यान बेन्नू लघुग्रहावरील नाइटिंगेल भागात पोहोचल्यानंतर या यानावरील रोबोटिक हात खुले करण्यात आले. भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे तीन वाजून 42 मिनिटांनी ओसायरस रेक्स यानाने बेन्नूवरील माती, खडे जमा करण्याची प्रक्रिया सुरु केली. ही प्रक्रिया पुढे 16 सेकंद सुरु होती.





TAG (Touch-And-Go) ची मोहिम अशी पार पाडण्यात आली


बेन्नू भोवतालच्या कक्षेतून ओसायरस रेक्स यान वक्राकार मार्गाने बेन्नूच्या जमिनीकडे मार्गस्थ झाले. त्यानंतर यानावरील रोबोटिक हात उघडण्यात आले. त्यानंतर या यानाचा वेग, स्थान तपासण्यात आले. या यानाने आपली गती लघुग्रहाच्या गतीशी जुळवून घेतली आणि वक्राकार मार्ग सोडून थेट जमिनीच्या दिशेने अलगद उतरले.


याानाचे खुले करण्यात आलेले रोबोटिक हात बेन्नूच्या नाइटिंगेल या 8 मीटर आकार असलेल्या भागात टेकवला गेले आणि पुढच्या 16 सेकंदाच्या कालावधीत माती, खड्यांचे नमुने जमा करण्यात आले. अपेक्षित नमुने जमा झाल्यावर यान बेन्नूपासून दूर, सुरक्षित अंतरावर गेले.


ही सर्व प्रक्रिया सुरु असताना नासावरील ओसायरस रेक्स थर्मल एमिशन स्पेक्ट्रोमीटर (OTES) या उपकरणाच्या सहाय्याने बेन्नूच्या नाइटिंगेल भागातील खनिजे आणि तापमानाच्या उत्सर्जनाच्या नोंदी घेण्यात आल्या.


बेन्नू लघुग्रहाच्या पृष्ठभागावरील खडकांचे आकार हे एखाद्या मोठ्या इमारतीप्रमाणे भव्य आहेत. त्यामुळे बेन्नू लघुग्रहाच्या जमिनीवरील मोठ्या खडकांशी यानाचा कसलाही संपर्क होऊ नये यासाठी या यानाचे सोलर पॅनल Y-Wing या आकारात वरच्या दिशेने उघडण्यात आले होते.


ओसायरस रेक्स हे बेन्नूच्या भोवती जवळपास दोन वर्षे फिरत आहे. या काळात त्याने बेन्नूच्या अभ्यास केला. यानाने किमान 60 ग्रॅम वजनाचे नमुने गोळा करणे नासाला अपेक्षित आहे. या नमुन्यासह ओसायरस रेक्स यान पृथ्वीवर 2023 साली परतणार आहे. या लघुग्रहांना वैज्ञानिक टाईम कॅप्सूल असेही म्हणतात.


या नमुन्याच्या आधारे शास्त्रज्ञांना आपल्या सौर मालिकेचा अभ्यास करता येणार आहे. पृथ्वीवर जीवन कसे सुरु झाले याचे रहस्यदेखील हे नमुने उघडू शकतात. अनेक वैज्ञानिकांनी हे मत मांडले आहे की अशा प्रकारच्या लघुग्रहासोबत झालेल्या धडकेमुळेच पृथ्वीवर जीवनाची सुरुवात झाली आहे.





काय आहे OSIRIS-REx मिशन?
OSIRIS-REx म्हणजे "Origins, Spectral Interpretation, Resource Identification, Security-Regolith Explorer." बेन्नू लघुग्रहावरुन माती आणि खडकांचे नमुने गोळा करुन पृथ्वीवर आणणे हे या मिशनचे ध्येय आहे. बेन्नू हा लघुग्रह पृथ्वीसाठी अत्यंत धोकादायक आहे. भविष्यात तो पृथ्वीवर आपटू शकतो असे शास्त्रज्ञांचे मत आहे.