लंडन : जर तुम्ही नोकरी करत असाल आणि कामाच्या मोबदल्यात जो पगार मिळतोय तो पुरेसा नाही. त्यामुळे नोकरी सोडून दुसरं काहीतरी करावं, असं वाटत असेल तर तुम्ही एकटे नाही. कारण ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही आपला पगार पुरेसा नसल्याचं वाटतं आणि येत्या सहा महिन्यात त्यांना राजीनामा देण्याचा त्यांचा मानस आहे. बोरिस जॉन्सन यांच्या पक्षाच्या एका खासदाराने नाव न छापण्याच्या अटीवर ब्रिटनमधील एका वृत्तपत्राला ही मागिती दिली आहे.


या खासदाराच्या दाव्यानुसार, "ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना वाटतं की, पंतप्रधान म्हणून त्यांना सध्या मिळणारा पगार हा त्यांच्या आधीच्या नोकरीच्या तुलनेत कमी आहे. एवढ्या कमी पगारात आपला खर्च भागत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.


बोरिस जॉन्सन यांचा मासिक पगार 12 लाख पगार
बोरिस जॉन्सन यांचं वार्षिक वेतन 150,042 पौंड (सुमारे 1.43 कोटी रुपये) आहे. हा त्यांचा सीटीसी आहे. त्यापैकी काही रक्कम पेन्शनच्या स्वरुपात कट होते. त्यामुळे त्यांच्या हातात महिन्याला सुमारे 12 लाख रुपये मिळतात. हे वेतन अतिशय कमी आहे. एवढ्या कमी वेतनात मी माझं आयुष्य व्यतीत करु शकत नाही असं सांगत येत्या सहा महिन्यात पद सोडण्याचा विचार जॉन्सन करत आहेत.


आधीच्या नोकरीत किती पगार?
बोरिस जॉन्सन याआधी ब्रिटनच्या एका वृत्तपत्रासाठी स्तंभलेखन करायचे आणि यासाठी त्यांना प्रतिमहिना 22 लाख रुपये मिळत होते. याशिवाय पंतप्रधान बनण्याआधी त्यांनी केवळ दोन भाषणातूनच दीड कोटी रुपये कमावले होते.
राजकारणात येण्याआधीपासूनच ते स्तंभलेख लिहून सध्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त कमाई करत होते. आता त्यांची जबाबदारी वाढली आहे परंतु वेतन मर्यादित आहे. त्यामुळे पंतप्रधानपद सोडल्यानंतर स्तंभलेख लिहून सध्याच्या उत्पन्नापेक्षा दुप्पट कमाई करत शकतो, असं त्यांचं मत आहे. त्यामुळेच राजीनामा देण्याचा त्यांचा विचार आहे.


सध्या ते ब्रेक्झिटवर तोडगा काढण्यासोबतच कोरोना महामारीशी कसा सामना करता येईल यावर लक्ष देत आहेत.


जॉन्सन यांच्यावर सहा अपत्यांची जबाबदारी
खासदाराने दिलेल्या माहितीनुसार, बोरिस जॉन्सन यांना सहा अपत्ये आहेत. त्यापैकी काही तरुण आहेत, त्यांचाही खर्च करावा लागते. शिवाय घटस्फोटित पत्नीलाही बऱ्यापैकी रक्कम द्यावी लागते. त्यांचा धाकटा मुलगा शाळेत जातो, त्याच्याही शिक्षणाचा खर्च बोरिस जॉन्सन यांना करावा लागतो.


पंतप्रधानपदासाठी संभाव्य नावांची चर्चा
पंतप्रधानपद सोडण्याचा विचार बोरिस जॉन्सन यांनी केल्यानंतर ब्रिटनमध्ये पुढील पंतप्रधान कोण याबाबत तर्क वितर्क लावण्यास सुरुवात झाली आहे. या चर्चेमध्ये संभाव्य उमेदवार म्हणून अर्थमंत्री ऋषी सुनक, परराष्ट्र मंत्री डॉमनिक रॉब, माजी आरोग्य मंत्री जेरेमी हंट, कॅबिनेट मंत्री मिशेल गोव यांचा समावेश असल्याचं कळतं.