NASA : येत्या तीन वर्षात, अंतराळ विश्वात पुन्हा एकदा ऐतिहासिक घटना घडणार आहे. 2024 पर्यंत पहिल्यांदाच एक महिला आणि एक कृष्णवर्णीय व्यक्ती चंद्रावर आपले पाऊल ठेवणार आहे. अमेरिकन अंतराळ संस्था नासा आपल्या अर्टेमिस मिशन कार्यक्रमाच्या अंतर्गत अमेरिकन अॅस्ट्रोनॉट्सना चंद्रावर पाठवण्याची तयारी करत आहे. त्याच्या पहिल्या कमर्शियल ह्युमन लॅन्डरचा विकास करण्याचे कॉन्ट्रॅक्ट इलॉन मस्क याच्या SpaceX या कंपनीला मिळालं आहे. नासाने या मोहिमेसाठी SpaceX सोबत 215 अब्ज रुपयांचा करार केला आहे. 


नासाने अपोलो मिशन नंतर पुन्हा एकदा मानवाला  चंद्रावर पाठवण्यासाठी SpaceX ची निवड केल्याचं इलॉन मस्कने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं आहे. 


 




महत्वाचं म्हणजे नासाचे हे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याच्या शर्यतीत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या आणि अमेझॉनचा मालक असलेल्या जेफ बेझोस याच्या मालकीच्या ब्लू ओरिजीन या कंपनीचाही समावेश होता. जेफ बेझोसच्या ब्लू ओरिजीन या कंपनीने लॉकहेड मार्टिन कॉर्पोरेशन, नॉर्थोप ग्रूमर कॉर्पोरेशन आणि ड्रेपर डायनेटिक्स या कंपन्यांशी मिळून बोली लावली होती. पण शेवटी इलॉन मस्कच्या SpaceX ने बाजी मारली. 


रॉयटर्सच्या वृत्तानुसार, SpaceX ला अॅस्ट्रोनॉटला चंद्रापर्यंत पोहोचवणाऱ्या लॅन्डरची एक चाचणी करावी लागेल. नासाने दिलेल्या माहितीनुसार, नासा चंद्राच्या कक्षेत ओरिऑन स्पेसक्राफ्टवर चार अॅस्ट्रोनॉट पाठवणार आहे. त्यामधील दोन अॅस्ट्रोनॉटना स्पेसएक्स ह्युमन लॅन्डिंग सिस्टिममध्ये शिफ्ट केलं जाणार आहे आणि ते नंतर चंद्रावर उतरतील. एक आठवड्याच्या संशोधनानंतर ते पुन्हा ओरिऑन स्पेसक्राफ्टवर परततील. 


महत्वाच्या बातम्या :