NASA Moon Rocket Launch : नासा (NASA) आता आणखी एका नव्या मोहिमेच्या तयारीत आहे. शनिवारी नासाकडून नवीन चंद्रयान (Moon Rocket) लाँच करण्यात येणार आहे. नासा आज शक्तिशाली चंद्रयान (Moon Rocket) लाँच करणार आहे. फ्लोरिडातील कॅनिडी स्पेस सेंटर (Kennedy Space Center) येथून आज दुपारी 2 वाजून 17 मिनिटांनी हे रॉकेट लाँच करण्यात येणार आहे. दरम्यान, हे रॉकेट याआधीच लाँच करण्यात येणार होतं. मात्र, यामध्ये काही तांत्रिक त्रुटी आढळल्याने या रॉकेटचं लाँचिंग पुढे ढकलण्यात आलं होतं. त्यानंतर या रॉकेटमधील तांत्रिक बिघाड दूर करण्याचं काम सुरु आहे. आता शनिवारी दुसऱ्यांदा हे रॉकेट लाँच करण्याचा प्रयत्न असेल. नासाकडून यासाठीची तयारी सुरु आहे. यावेळी रॉकेट लाँट यशस्वी होईल अशी आशा नासाच्या शास्त्रज्ञांना आहे. 'आर्टेमिस आय' (Artemis I) असं नासाच्या या चंद्रयान मोहिमेचं नाव आहे.


आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी हवामान चांगले राहील. त्यामुळे नासाच्या मून रॉकेटचे प्रक्षेपण सुरक्षितपणे होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, मून रॉकेटच्या प्रक्षेपणवेळी कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही याचीही पूर्ण काळजी घेतली जात आहे. मून रॉकेटचे प्रोग्रॅम मॅनेजर जॉन हनीकट जॉन हनीकट यांनी सांगितलं की, प्रक्षेपणाच्या वेळी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून चंद्रयाना संबंधित सर्व संभाव्य तांत्रिक त्रुटी दूर करण्याचं काम सुरु आहे.


इंधन टाकीतील बिघाड दुरुस्त 


याधी रॉकेट लाँच करताना इंधन टाकीतील बिघाड झाल्यानं रॉकेट लाँच होऊ शकलं नव्हतं. मात्र, आता रॉकेटच्या इंधन टाकीतील बिघाडही दुरुस्त करण्यात आला आहे. नासाचे जेरेमी पार्सन्स यांनी सांगितलं आहे की, आमची टीम उत्तम काम करत आहे. म्हणूनच आम्ही चंद्र रॉकेट शनिवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी 2:17 वाजता प्रक्षेपित करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या ब्रीफिंगनंतर आम्ही ओरियनचे ऑपरेशन केल्याचे त्यांनी सांगितले. रॉकेटसंदर्भातील सर्व तांत्रिक तपासण्या पूर्ण झाल्या आहेत. 


29 ऑगस्ट रोजी होणार होतं चंद्रयानचे प्रक्षेपण


नासाच्या या चंद्रयानचं 29 ऑगस्ट रोजी या चंद्रयानचे प्रक्षेपण करण्यात येणार होतं. चंद्र रॉकेट लाँच करण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली होती, परंतु प्रक्षेपण होण्यापूर्वीच त्याच्या इंजिनमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे शेवटच्या क्षणी चंद्रयानचं प्रक्षेपण थांबवण्यात आलं होतं. इंजिन सेन्सरमध्ये काही समस्या निर्माण झाली होती, त्यामुळे चंद्रयानचं प्रक्षेपण थांबवावं लागलं, असं त्यावेळी नासाकडून सांगण्यात आलं होतं.


नासाची 'आर्टेमिस आय' मोहिम



  • 'आर्टेमिस आय' (Artemis I) हे नासाची मानवरहित मोहिम आहे.

  • यामध्ये नासाच्या स्पेस लॉन्च सिस्टम (SLS) रॉकेट आणि ओरियन क्रू कॅप्सूलची चाचणी करण्यात येईल.

  • मानव चंद्रावर जाण्याआधीची ही चाचणी असेल.


मिशनमध्ये कोणताही अंतराळवीर जाणार नाही, तर मानवी पुतळे जातील


मानवाला चंद्रावर पाठवण्यापूर्वी ही एक टेस्ट आहे. या चंद्रयानामधून एकही वैज्ञानिक चंद्रावर जाणार नाही. या रॉकेटमध्ये ओरियन कॅप्सूल (Orion Crew Capsule) आहे. ओरियनमध्ये मानवांच्या जागी पुतळे ठेवले जात आहेत. यावेळी नासा स्पेससूट आणि रेडिएशन लेवलेचे मूल्यांकन करेल. पुतळ्यांसोबत एक स्नूपी सॉफ्ट टॉय देखील पाठवला जात आहे, जे शून्य गुरुत्वाकर्षण निर्देशक म्हणून काम करेल. ओरियन चंद्राभोवती 42 दिवसांचा प्रवास करेल.


'आर्टेमिस आय' चंद्रयान मोहिमेचा हेतू काय?


'आर्टेमिस आय' चंद्राभोवती महिनाभर प्रवास करण्यासाठी एक क्रूड रॉकेट पाठवेल. अंतराळ संशोधनात महिलांचा सहभाग वाढवणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. या रॉकेटमधील 30 टक्के इंजिनीअर महिला आहेत. याव्यतिरिक्त, आर्टेमिस आय मिशनमध्ये महिलांच्या शरीरावर रेडिएशनच्या प्रभावांचा अभ्यास करण्यासाठी डिझाइन केलेले दोन पुतळे असतील, जेणेकरून नासा महिला अंतराळवीरांचे अधिक चांगले संरक्षण कसे करावे हे शिकू शकेल.