Nasa Artemis-1 Rocket Launch: नासाचे (Nasa) सर्वात शक्तिशाली रॉकेट आज अंतराळात लॉन्च केले जाणार होते. मात्र आता अनिश्चित काळासाठी याची लॉन्चिंग पुढे ढकलण्यात आली आहे. नासाने याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे. याची लॉन्चिंग आता थांबवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. इंजिन क्रमांक तीनमध्ये बिघाड झाल्याने याची लॉन्चिंग थांबण्यात आल्याचे नासाने सांगितले आहे.


नासाने ट्वीट करत म्हटले आहे की, Artemis -1 चे लॉन्चिंग आज होणार नाही. इंजिनमध्ये ऑइल लीक होत असून आम्ही त्यावर काम करत आहोत. टीम यासंबंधित डेटा गोळा करत आहे. तसेच पुढील लॉन्चिंग तारखी ही लवकरच जाहीर करणार असल्याचं नासाने सांगितलं आहे. 


 






मिळालेल्या माहितीनुसार, हे 322 फुटांचे रॉकेट नासाने बनवलेले आतापर्यंतचे सर्वात शक्तिशाली रॉकेट आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नासाने बनवलेले हे रॉकेट चंद्रावर जाणार आहे. तसेच हे काही छोटे उपग्रह कक्षेत सोडेल आणि स्वतः कक्षेत स्थापित होईल. Artemis -1 या नवीन अंतराळ प्रक्षेपण प्रणालीचे हे पहिले उड्डाण असेल. नासाने नमूद केल्याप्रमाणे हे एक हेवी लिफ्ट रॉकेट आहे. आतापर्यंत लॉन्च केलेल्या रॉकेटच्या तुलनेत यात सर्वात शक्तिशाली इंजिन आहेत.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर पहिल्या दोन आर्टेमिस मोहिमा यशस्वी झाल्या. तर अंतराळवीरांना चंद्रावर परत आणण्याचे नासाचे लक्ष आहे. ज्यामध्ये 2025 च्या सुरुवातीला चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या पहिल्या महिलेचा देखील समावेश आहे.


मिशनमध्ये कोणताही अंतराळवीर जाणार नाही, तर मानवी पुतळे जातील


मानवाला चंद्रावर पाठवण्यापूर्वी ही एक टेस्ट आहे. सध्या त्यात एकही वैज्ञानिक जाणार नाही. ओरियनमध्ये मानवांच्या जागी पुतळे ठेवले जात आहेत. यावेळी नासा स्पेससूट आणि रेडिएशन लेवलेचे मूल्यांकन करेल. पुतळ्यांसोबत एक स्नूपी सॉफ्ट टॉय देखील पाठवला जात आहे, जे शून्य गुरुत्वाकर्षण निर्देशक म्हणून काम करेल. ओरियन चंद्राभोवती 42 दिवसांचा प्रवास करेल.