NASA Artemis 1 Launch : गेली काही वर्षे नासाचे (NASA) वैज्ञानिक आर्टेमिस 1 (Artemis 1) मिशनमध्ये गुंतले होते, अखेर ते प्रक्षेपित होणार आहे. सोमवारी केप कॅनवेरल लॉन्च कॉम्प्लेक्स येथून ओरियन अंतराळयान प्रक्षेपित केले जाईल. या अभियानाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मानवाला चंद्रावर पाठवण्यापूर्वी नासाचे हे प्रथम चाचणी उड्डाण असेल, ज्यामध्ये एकही अंतराळवीर जाणार नाही.


 






 


सर्वात शक्तिशाली स्पेस रॉकेट अंतराळात जाण्यासाठी सज्ज 
नासाचे आजपर्यंतचे सर्वात शक्तिशाली स्पेस रॉकेट पृथ्वी सोडून अंतराळात जाण्यासाठी सज्ज झाले आहे. 50 वर्षांनंतर नासा मानवाला चंद्रावर पाठवण्याच्या तयारीत आहे. नासा आर्टेमिस 1 मोहिमेअंतर्गत हे पहिले चाचणी उड्डाण अवकाशात पाठवत आहे. हे रॉकेट आज फ्लोरिडा लाँचपॅडवरून लॉंच होईल. आर्टेमिस 1 अंतर्गत, मिशन ओरियन अंतराळ यानाकडे पाठवले जाईल, ज्यामध्ये 6 लोकांसाठी बसण्यासाठी डीप-स्पेस एक्सप्लोरशन कॅप्सूल आहे. यात 2,600 टन वजनाचे 322 फूट लांब स्पेस लॉन्च सिस्टम (SLS) मेगारॉकेट असेल. हे रॉकेट सोमवारी सकाळी 8.33 वाजता पहिल्या लिफ्टऑफसाठी सज्ज आहे. हे रॉकेट तब्बल 42 दिवस चंद्राभोवती फिरणार आहे


मिशनमध्ये कोणताही अंतराळवीर जाणार नाही,, तर मानवी पुतळे जातील
मानवाला चंद्रावर पाठवण्यापूर्वी ही एक टेस्ट आहे. सध्या त्यात एकही वैज्ञानिक जाणार नाही. ओरियनमध्ये मानवांच्या जागी पुतळे ठेवले जात आहेत. यावेळी नासा स्पेससूट आणि रेडिएशन लेवलेचे मूल्यांकन करेल. पुतळ्यांसोबत एक स्नूपी सॉफ्ट टॉय देखील पाठवला जात आहे, जे शून्य गुरुत्वाकर्षण निर्देशक म्हणून काम करेल. ओरियन चंद्राभोवती 42 दिवसांचा प्रवास करेल.


ही मोहीम यशस्वी झाल्यास....
ही मोहीम यशस्वी झाल्यास 2025 च्या अखेरीस महिला आणि दोन अंतराळवीर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरतील. दुसरे चाचणी उड्डाण आर्टेमिस II, मे 2024 मध्ये नियोजित असेल, यावेळी डमी अंतराळवीर अवकाशयानाद्वारे पाठवले जात आहेत


दीर्घकाळ अंतराळात राहणारे हे पहिले अंतराळयान


अंतराळ स्थानकावर डॉक न करता दीर्घकाळ अंतराळात राहणारे ओरियन हे पहिले अंतराळयान असेल. ते ऑक्टोबरमध्ये पृथ्वीवर परतेल. हे यान चंद्राच्या जवळ जाण्यासाठी 60,000 किमी प्रवास करेल, तेथे 42 दिवसांचा कालावधी असेल आणि पृथ्वीवर परत येईल.


ओरियन अंतराळयान विविध प्रयोग करणार


नासाचे शास्त्रज्ञ या अवकाशयानाद्वारे विविध प्रयोग करणार आहेत. बायोएक्सपेरिमेंट-1 हा चार प्रयोगांचा एक सेट आहे, जो चंद्र आणि मंगळावर मानव पाठवण्यापूर्वी अवकाशातील किरणोत्सर्गाच्या परिणामांचा अभ्यास करेल.


...तर अंतराळवीरांना होऊ शकतात गंभीर आजार 
नासाच्या माहितीनुसार पुरेशा संरक्षणाशिवाय, स्पेस रेडिएशन धोकादायक असू शकते. मोठ्या प्रमाणात रेडिएशनच्या संपर्कात असलेल्या अंतराळवीरांना गंभीर आजार होऊ शकतात. पुढे कर्करोग होण्याचीही शक्यता असते. किरणोत्सर्ग केवळ मानवांसाठीच नाही तर अंतराळ यानाच्या इलेक्ट्रॉनिक्स प्रणालींसाठी देखील चांगले नाही.


शेवाळ, बुरशी आणि यीस्ट अंतराळात पाठवणार


शास्त्रज्ञ अवकाशयानात वनस्पतींच्या बियाही पाठवत आहेत. याव्यतिरिक्त, रेडिएशनच्या प्रभावाचा अभ्यास करण्यासाठी आणि अशा जागेत जैविक प्रणाली कशा जगतात आणि कशा विकसित होतात याचा अभ्यास करण्यासाठी शेवाळ, बुरशी आणि यीस्ट पाठवत आहेत. याचा अभ्यास करून डेटा गोळा करण्यात येईल यानंतर त्याचे विश्लेषण करण्यात येईल.